साक्री येथील सिगो पाटील महाविद्यालयात संत रविदास जयंती साजरी
साक्री (प्रतिनिधी) समाजातील जातिवाद वर्णवाद रूढी वाद पुरोहित वाद व अस्पृश्यता नष्ट करून सामाजिक समता प्रस्तापित करण्यासाठी संत शिरोमणी रविदास महाराजांनी आपल्या विचार व कृतीतून आयुष्यभर कार्य केले असे मत डॉ शत्रुघ्न पाटोळे यांनी व्यक्त केले. ते विद्या विकास मंडळाचे सि गो पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री येथे एन मुक्तो संघटना सीगो पाटील महाविद्यालय एककाच्या सर्वसाधारण सभेत संत शिरोमणी रविदास महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे तसेच संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी प्राध्यापक उपस्थित होते. प्रसंगी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धा मध्ये महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक व राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य म्हणून प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे यांची निवड झाल्याबद्दल संघटनेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर डॉ सचिन गोवर्धने यांची करियर कट्टा जिल्हा समन्वयक म्हणून निवड झाल्याबद्दल संघटनेकडून सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तरादाखल बोलताना प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे यांनी कार्य करण्यास अधिक प्रवृत्त करण्यासाठी आपले सर्वांचे प्रोत्साहन महत्त्वाचे असल्याचे मत मांडले. राष्ट्रसंत रविदास महाराज यांच्या “ऐसा चाहू राज मै,जहा मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बैसे,रविदास रहे प्रसन्न” या प्रसिद्ध पदाचा अर्थ सांगून त्याच्याशी समरूप जीवन व्यतीत करण्याचे आवाहन देखील प्रसंगी डॉ राजेंद्र अहिरे यांनी केले. सदर संघटनेच्या सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यात एन मुक्तो सी गो पाटील महाविद्यालय एकक संघटनेचे अध्यक्ष म्हणून डॉ एम एम सैंदाणे,उपाध्यक्ष प्रा व्ही एस धनगर,सचिव डॉ डी एन चौबे, सहसचिव डॉ ए पी सोनवणे, कोषाध्यक्ष डॉ एल बी पवार, अंतर्गत हिशोब तपासनिक डॉ पी एस साळुंखे, जिल्हा प्रतिनिधी डॉ एस एस पाटोळे, महिला प्रतिनिधी डॉ जे एस वाकोडे, केंद्रीय प्रतिनिधी निवृत्त प्रा एस डी पालखे,तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून डॉ एस आर गोवर्धने यांची निवड करण्यात आली. मागील 44 वर्षांपासून एन मुक्तो संघटनेच्या सी गो पाटील महाविद्यालय एकका च्या माध्यमातून प्राध्यापकांचे विविध प्रश्न व समस्यांचे निर्मूलन करण्याचे कार्य केले जाते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ अनंत पाटील, प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले.