धुळे शहरातील ५०० फुटाच्या घरांच्या मालमत्ता कर रद्द करावा ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मनपाकडे मागणी
धुळे (प्रतिनिधी) महानगरपालिकेने शहरांमधील ५०० फुटांपर्यंत घरांचा मालमत्तेचा कर माफ करावा अशी मागणी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महानगरपालिकाचे महापौर श्री प्रदीप नाना कर्पे व आयुक्त देविदास टेकाळे यांची भेट घेऊन मागणी केली.
नुकतेच मुंबई महानगर पालिकेने ५०० फुटांच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर धुळे महानगर पालिकेने निर्णय घ्यावा. मुंबई मनपा प्रमाणे लवकरच राज्यातील औरंगाबाद, नाशिक, पुणे, जळगाव महानगरपालिका मध्ये निर्णय घेतला जाणार आहे. त्याच धर्तीवर धुळे मनपा प्रशासनाने निर्णय घ्यावा. कारण धुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर, कारागीर, शेतकरी पुत्र, छोटे व्यवसायिक, छोटे व्यापारी, खाजगी कर्मचारी,जेष्ठ नागरिक यांचे वास्तव्य आहे. त्यासाठी नवीन वर्षासाठी ही मोठी भेट असेल. ५०० फुटापर्यंत घरांचा मालमत्ता कर रद्द करून धुळेकर नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली केली आहे. तरी धुळे महानगरपालिकेने यावर निर्णय घेऊन जाहीर करावा अशी मागणी पक्षाच्या शिष्टमंडळाने माननीय महापौर व महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली.
यावेळी विरोधीपक्ष नेता कमलेश देवरे, माजी सभापती कैलास चौधरी, उपाध्यक्ष नंदू एलमामे,अध्यक्ष महेंद्र शिरसाठ, नगरसेवक लल्लू भैय्या, मुख्तार मंसुरी, राजू डोमाडे, राजेंद्र सोळुंकी, कुणाल पवार, हासिम कुरेशी, राजू चौधरी, ज्ञानेश्वर माळी, जमीर शेख, राज कोळी, उमेश महाले, जगन ताकटे, आबीद मणियार आदी पदाधिकारी उपस्थित होते.