काँग्रेस-NCP काय मिळणार ? मुंबई महानगरातील लोकसभेच्या दहापैकी आठ जागांसाठी ठाकरे इच्छुक
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातर्फे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नसले, तरी ठाकरे गटाचा मुंबई भागावर वरचष्मा राहण्याचे संकेत यातून दिसतात.

मुबंई : (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मध्ये मोडणाऱ्या लोकसभेच्या दहा पैकी आठ जागा लढवण्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यानुसार महाविकास आघाडीत लढताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा येण्याची शक्यता आहे. किंवा शरद पवार गट मुंबई महानगराबाहेर लक्ष केंद्रित करुन काँग्रेसला दोन्ही जागा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नसले, तरी ठाकरे गटाचा मुंबई भागावर वरचष्मा राहण्याचे संकेत यातून दिसतात.
मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मध्ये बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि पनवेल हा भाग येतो. यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ (उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मुंबई), ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर आणि भिवंडी यांचा समावेश होतो.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातर्फे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. गेल्या लोकसभेला (शिंदे-ठाकरे एकत्र असताना भाजपसोबत युतीत लढताना) मुंबईतून शिवसेनेने लढवलेल्या तीनपैकी तीन जागा निवडून आल्या होत्या. त्यातील राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर हे दोन खासदार एकनाथ शिंदे गटासोबत आहेत, तर अरविंद सावंत हे ठाकरे गटासोबत आहेत.