शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा नगरपरिषद येथील २१ कोटीची पाणी पुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ
शहर भाजपातर्फे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुक्यातील दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेचा २८ डिसेंबरला २०२१ ला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे, शासनाने नगरपरिषद बरखास्त करून मागील शंभर दिवसांपासुन प्रशासक नियुक्त केले आहेत. परंतु प्रशासनावर अंकुश ठेवणारे कुणीही नसल्याने शहरात पाणी पुरवठासह कोणत्याही नागरी सुविधेकडे लक्ष दिले जात नसून, गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण देखील वाढत आहे.माजी नगराध्यक्षा सौ नयनकुवरताई रावल यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपये निधी आणला होता. त्यातील काही कामे अपूर्ण आहेत. त्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. या सर्व बाबीकडे लक्ष द्यावे असे, निवेदन भारतीय जनता पक्ष दोंडाईचाचे शहराध्यक्ष प्रविण महाजन व पदाधिकाऱ्यांनी आज पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांना दिले आहे.
निवेदनाचा आशय असा की,पाणीपुरवठा योजनेचा बट्याबोळ केला जात आहे. म्हणजे २१ कोटी रुपये निधी आणून माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांनी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना आणली आहे. काही किरकोळ कामे अपूर्ण आहेत. ती कामे अद्याप मार्गी लागत नाहीत.तर उन्हाळ्यात तापी नदीचे साचलेल्या पाण्यावर अधिक प्रकिया करून शुद्ध करण्याची गरज असते. पण ती होत नसल्याने हिरवे पाणी येण्याची समस्या प्रशासक कडून सुटत नाही आहे. मागील वर्षी तत्कालीन सभापती वैशाली प्रविण महाजन यांनी पुणे येथील गोताखोंराच्या माध्यमातून पाण्यातील गाळ काढुनी पाण्यावर प्रक्रीयेचे शास्त्र अवगत करुन घेतले होते. तीच प्रक्रिया यावर्षी अंमलात आणली पाहिजे होती. तसेच तावखेडा येथील पंप व मोटार बिघडल्यास जादा मोटारीचे तांत्रिक मान्यता घेण्याचे प्रलंबित आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सदर चांगली योजनेचा बट्याबोळ करण्याचे काम प्रशासककडून होत आहे.
आता सर्व कारभार प्रशासनाने हाती घेतल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. शहरातील बरेच ठिकाणी पथदिवे बंद आहेत. शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. माजी मंत्री आ जयकुमार रावल यांच्या संकल्पनेने शहरात राजपथ सह अन्य अतिशय सुशोभित करणारी कामे मार्गी लागली आहेत. त्यांची निगा राखण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करणे आवश्यक आहे. पण कुठे पथदिवे बंद तर कुठे शासकीय मालमत्ता चोरीस जात आहे. जवळपास ५० ठिकाणी सार्वजनिक बगीचे निर्माण केले असून त्यांची निगा देखील राखली जात नाही आहे. स्वच्छता मोहीम हाती घेण्यात कुणालाही रस दिसत नाही.
दोंडाईचा शहरातील गेल्या ५ वर्षांपासून विकासकामांसाठी मा.आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी दोंडाईचा शहरासाठी आणला. त्यांची काही कामे पुर्णत्वास तर काही कामे प्रगतीपथावर तसेच अंतिम टप्प्यात आहेत. परंतु प्रशासक नियुक्त झाल्यापासून विकासकामांचा वेग मंदावला आहे. प्रशासक पदावर आल्यापासून पुर्णपणे ठप्प पडले आहेत. आजही सिंधी काँलनी ,हुडको झोन ,आनंदनगर झोन ,राऊळनगर ,गांवभाग व वरवाडे झोन इ. तातडीने पूर्ण केल्यास शहरात दररोज पाणीपुरवठा मुबलक व योग्य दाबाने पाणीपुरवठा होऊ शकेल. याबाबींकडे प्रशासनाचा पाठपुरावा होत नाही आहे. त्यामुळे अत्यंत सुरळीत असलेली योजना विस्कळीत होत आहे. तसेच दाऊळ येथील जल शुद्धीकरण प्रकल्पातील उर्वरीत कामे पुर्ण करुन प्रकल्प पुर्ण करणे, जेणेकरून शहरातील नागरीकांना स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा होईल.
शहरातील अनेक चौक सुशोभीकरण करण्यासाठी विविध ठिकाणी शिल्प उभारण्याचे काम होऊ घातले आहे. तसेच शहरातील राजमाता अहिल्यादेवी चौकात मातृशिल्प व इतर सर्व कामांना गती देऊन कामे पुर्ण करावीत जेणेकरुन शहर सौंदर्यात मोठी भर पडेल. महाशय वरील विषय शहरातील नागरिकांच्या मुलभुत सुविधा, सुरळीत पाणीपुरवठा व विकासासाठी प्रस्तुत करण्यात आले आहेत. तरी सर्व विषयांकडे लक्ष देण्याची मागणी भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन, सरचिटणीस कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, भरतरी ठाकुर, माजी नगरसेवक जितेंद्र गिरासे, गिरधारीलाल रूपचंदानी, चंद्रकला सिसोदीया, मनोहर कापुरे आदी पदाधिकाऱ्यांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.