पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावरील एका सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक लोकप्रिय म्हणजेच लोकमान्यता असणारे नेते म्हणून पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळालं आहे. पंतप्रधान मोदींची मान्यता गुणांकन म्हणजेच अॅप्रूव्हल रेटिंग हे जगातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक आहे. ७१ टक्क्यांसाहीत मोदींनी या यादीमध्ये पहिलं स्थान मिळवलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरले आहे. त्यांनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी यासारख्या नेत्यांचाही या यादीमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी समावेश आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलंय.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कितव्या स्थानी?
या सर्वेक्षणामध्ये जगभरातील १३ मोठ्या नेत्यांचा कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सहाव्या स्थानी आहेत. त्यांना ४३ टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. बायडेन यांच्या खालोखाल कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांचा क्रमांक या यादीमध्ये लागलाय. त्रुदो यांनाही ४३ टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा क्रमांक असून ४१ टक्के लोकांनी मॉरिसन यांच्या बाजूने मतदान केलंय.
तळाशी कोण?
या यादीच्या तळाशी ११ व्या स्थानी ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो, १२ व्या स्थानी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि १३ व्या स्थानी ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आहेत. बोल्सोनारो यांना ३७ टक्के, मॅक्रॉन यांना ३४ टक्के तर जॉन्सन यांना अवघी २६ टक्के मतं मिळाली आहे.
कधी करण्यात आलं हे सर्वेक्षण?
“सध्या समोर आलेली आकडेवारी ही १३ ते १९ जानेवारी २०२२ दरम्यान जमा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे तयार केलेली आहे. प्रत्येक देशामध्ये राहणाऱ्या सज्ञान व्यक्तींच्या मुलाखतींमधून ही माहिती जाणून घेतली जाते. ही आकडेवारी दर आठवड्याला अपडेट केली जाते. प्रत्येक देशानुसार सर्वेक्षणाची सॅम्पल साइज वेगवगेळी असते,” असं मॉर्निंग कन्सल्टच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.