लाखो रुपये खर्च करून बांधलेली तलाठी कार्यालयाची इमारत बनली शोभेची वस्तू
ढाणकी : एकीकडे अपुऱ्या जागेमुळे मुळे शासकीय कार्यालयाना तडजोड करून काम करावे लागत असताना दुसरीकडे मात्र नवीन इमारत तयार असूनही काही उपयोग होत नसून लोक त्या इमारतीच्या भिंतीवर लघुशंका व घाण करत असल्याने शासनाचे लाखो रुपये वाया गेले याचा प्रत्यय येत आहे.
ढाणकी येथे शासकीय गोदामात जवळील तलाठी कार्यालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून चार ते पाच महिन्यापासून इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे तेथे लोक घाण तसेच भिंतीवर लघुशंका करत असल्याने इमारतीचे सौंदर्य लयाला जात आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेली असूनही कशामुळे तलाठी कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित का होत नाहीये असा प्रश्न नागरिकांना पडला आहे?
सुरुवातीला या इमारतीला कोणतेही गेट नसल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे आता तिथे मोठे गेट बसवलेले असून त्याला कुलूप लावण्यात आले आहे. इमारत पूर्णपणे तयार झालेली असूनही तिचे उद्घाटन होत नसल्याने ती पूर्णपणे शोभेची वस्तू बनली आहे . तरी लवकरात लवकर सदर इमारतीमध्ये तलाठी कार्यालय हस्तांतरित करण्याची मागणी नागरिक करत आहे.