राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जावून घेतला रब्बी पिकाचा आढावा
रब्बीच्या लागवडी क्षेत्रात 221 टक्यांनी विक्रमी वाढ ; गहू, मका सह सूर्यफूल पिके जोमात
सिल्लोड (विवेक महाजन) महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जावून मतदारसंघातील रब्बी पिकांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. सतत व अवकाळी पाऊस, वादळ अशा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर नुकसानीचे ठरले.असे असले तरी यावर्षी पाण्याच्या उपलब्धतेमुळे गेल्यावर्षी पेक्षा यंदा रब्बीचे सरासरीपेक्षा 221 टक्के म्हणजेच 3 पट लागवड क्षेत्र वाढले आहे.
तालुक्यातून हद्दपार झालेले सूर्यफूलाची यावर्षी तब्बल 2 हजार हेक्टर वर लागवड झाल्याचे चित्र आहे. गहू, सोयाबीन, मका , कांदा आदी रब्बीचे पिके जोमात दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळवा यासाठी तालुका कृषि विभाग, सिल्लोड कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून राज्यातील विविध मुख्य बाजारपेठेतील दररोजचे भाव फलक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, संचालक दामूअण्णा गव्हाणे, सतिष ताठे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे यांच्यासह विविध ठिकाणचे मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
निसर्गाच्या लहरीपणामुळे अलीकडच्या काळात हवामानात अचानक बदल होताना दिसतो. यासाठी हवामान खात्याकडून वेळीवेळी सूचना देखील दिल्या जातात या सुविधांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. अनेक शेतकऱ्यांना नवीन मोबाईल वापरता येत नाही त्याकरिता कृषी सहाय्यक , कृषी मित्र यांनी कायम शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून मार्गदर्शन करावे. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक महत्वकांक्षी योजना आखल्या आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनेचे ग्रामसभेत वाचन करावे असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी यांनी कापूस पिकांवरील गुलाबी बोन्डअळीचे जीवनचक्र संपुष्टात आणण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच तालुक्यातील रब्बी पिकाच्या पिकपेरा बाबत माहिती दिली.