कपिल शर्मानं केली पंतप्रधान मोदींची मिमिक्री ; म्हणाला, आज रात 8 बजे…
मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा हा नेहमी आपल्या विनोदी कार्यक्रमांमुळे चर्चेत असतो. कपिलने कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमानंतर कपिल देशातील घराघरात पोहोचला आहे. त्यानंतर आता कपिल नेट फ्लिक्सच्या आय अॅम नॉट डन येट या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याने या कार्यक्रमाचा ट्रेलर देखील शेअर केला आहे. या ट्रेलरने चांगलाच धुमाकुळ घातला असून, यामध्ये कपिल स्टँडअप कॉमेडी करताना दिसतो आहे. विशेष म्हणजे कपिलने आता थेट पंतप्रधान मोदींची मिमिक्री केली आहे.
यापूर्वी कपिल शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक ट्वीट केले होते. यामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. कपिलने त्याच्या नेटफ्लिक्सवरील स्टँडअप कॉमेडी शो मध्ये याबद्दलचा उल्लेख करत मोदींची खिल्ली उडवली आहे. “अमृतसरमध्ये तीन गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत. पहिले वाघा बॉर्डर, दुसरे सुवर्णमंदिर आणि तिसरे या दोघांच्यामध्ये उभे असलेले छोले-कुलचे विकणारे. या छोले-कुलचे विकणाऱ्या विक्रेत्यांच्या मनात फक्त एकाच गोष्टीची भीती सतत असते की अचानक कोणी रात्री ८ वाजता येईल आणि मित्रों… म्हणत त्यांच्या छोले-कुलचेची विक्री बंद करेल”. असे कपिल यावेळी म्हणाला. कपिलचे हे बोलणे ऐकून प्रेक्षक जोरजोरात हसायला लागतात. त्यासोबत फार टाळ्याही वाजवतात. विशेष म्हणजे मोदींबद्दल हा किस्सा सांगताना कपिल हा पंतप्रधान मोदींच्या आवाजाची हुबेहुब नक्कलही करतो.
कपिल शर्माच्या या नव्या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या नव्या शोच्या ट्रेलरमध्ये कपिल शर्मा त्याची अनेक गुपिते उघड करताना दिसत आहे. यावेळी द कपिल शर्मा शोची संपूर्ण टीम आणि त्याचे कुटुंबही उपस्थित असल्याचे दिसत आहे. कपिलचा हा नवा शो येत्या २८ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.