ठरलं ! राज्यातील १३ महापालिकांमधील आरक्षण सोडत ३१ मे रोजी !
पिंपरी : महापालिकांची प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर आता तेथील आरक्षणाची सोडत येत्या ३१ मे रोजी काढण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नागपूर, अमरावती, अकोला या १३ महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाने आज जाहीर केला. येत्या १३ जूनला आरक्षण अंतिम होऊन ते प्रसिद्ध होणार आहे.
या तेरांपैकी बहुतांश पालिका हद्दीत त्यातही नवी मुंबई, कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, उल्हासनगर, कल्याण-डोंबीवलीमध्ये जून, जुलैमध्ये मोठा पाऊस होतो. त्यामुळे आरक्षण फायनलनंतरचा दीड महिन्याचा निवडणूक प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता या पालिकांमध्ये पावसाळ्यात नाही, तर तो संपल्यानंतर सप्टेंबर वा ऑक्टोबरच्या सुरुवातीस या निवडणूका होतील, असा अंदाज आहे. तसेच, तोपर्यंत ओबीसी आरक्षणावरही न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता असल्याने कळीचा मुद्दा ठरलेल्या ओबीसी आरक्षणासह या निवडणूका होण्याचा संभव आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांत पन्नास टक्के महिला आरक्षण आहे. त्यानुसार २२ एससी (अनुसूचित जाती), तर तीन एसटी (अनुसूचित जमाती) महिलांच्या जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेत राखीव आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये या वेळी एकूण १३९ जागा आहेत. गतवेळी २०१७ च्या निवडणुकीत त्या १२८ होत्या, त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर किमान ७० महिला पालिकेत असतील.
या सर्वसाधारण (ओपन) आणि एससी, एसटची महिला जागांचे आरक्षण ३१ तारखेला काढण्याचा आदेश आयोगाने पालिकेला दिला आहे. त्यासाठीची जाहीर नोटीस २७ तारखेला निघेल. आरक्षण काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. ता. १ ते ६ जूनपर्यंत त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यांचा विचार करून १३ जून रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.