मेटेंच्या अपघाताबाबत संशय वाढला? मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश
दिनांक-१९आँगस्ट २०२२
मुंबई प्रतिनिधि
शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघातात निधन झाले होते.
त्यानंतर मेटेंच्या मृत्यूबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले आहेत…
या अपघातावेळी मेटेंसोबत प्रवास करत असलेले दोघे जण बचावले आहेत. तर मेटेंच्या गाडी चालकाची देखील कसून चौकशी करण्यात आली आहे. विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी चालकासंदर्भात बोलताना केलेले विधान प्रकरणात गूढ वाढवणारे आहे. चालक अपघाताचे ठिकाण सांगत नव्हता असे ज्योती यांनी म्हटले आहे. सत्य लपवण्याचा प्रयत्न होतोय असे वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान,विनायक मेटेंच्या निधनामुळे अनेक प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. मेटेंच्या गाडीला नेमका कशामुळे अपघात झाला हे अजून समोर आलेले नाही. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी काही आरोप केले आहे, त्यामुळे मेटे यांचा अपघात आहे की घातपात याची चर्चा रंगली आहे.