अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे.
अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. पोलीस बदली प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्याशिवाय, अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. ईडीने दापोली रिसॉर्ट प्रकरणात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.
पोलीस बदल्यांप्रकरणी आरोपी सचिन वाझेंच्या जबाबामध्ये अनिल परबा यांचे नाव समोर आले होते. वाझेच्या जबाबानंतर ईडीकडून तपास सुरू झाला. त्याच अनुषंगाने ईडीने आज छापा मारला.