पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार? मोदींच्या दौऱ्यात गुप्त माहितीकडे दुर्लक्ष
चंदिगड (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यात बुधवारी सुरक्षेत घोडचूक झाली. हे प्रकरण तापले आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात निदर्शक गडबड करू शकतात, याची गुप्त माहिती पंजाब पोलिसांना होती. तरीही पंजाब पोलिसांनी ‘ब्ल्यू बुक’चे पालन केले नाही आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात आकस्मिक मार्ग तयार केला नाही, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या ब्ल्यू बुकमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसंदर्भात दिशा-निर्देश दिले गेले आहेत. ब्ल्यू बुकनुसार कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत राज्य पोलिसांना आकस्मिक मार्ग तयार करावा लागतो. आणि अशीच स्थिती पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात निर्माण झाली होती, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. गुप्तचर विभागाचे अधिकारी पंजाब पोलिसांच्या संपर्कात होते. राज्य पोलिसांना निदर्शकांबाबत अलर्ट करण्यात आले होते. त्यानंतर पंजाब पोलिसांनी व्हीआयपीच्या पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले होते, असे गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले.
PM मोदी सुरक्षेतील चुकीवर पंजाब काँग्रेसमध्ये पडले दोन गट पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पंजाब काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. यापूर्वी माजी प्रदेशाध्यक्ष आणि प्रचार समितीचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पंजाब सरकारमधील मंत्री राणा गुरजीत यांनी आता मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. तर फिरोजपूरचे आमदार परमिंदर पिंकी यांनी यासाठी डीजीपीला जबाबदार धरले. दुसरीकडे, याप्रकरणी भाजप नेते आज राज्यपाल बी. एल. पुरोहित यांची भेट घेणार आहेत. ते पंजाबमधील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीची मागणी करू शकतात. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीच ही मागणी केली आहे.
पंजाब सरकारची प्रतिमा डागाळली
मंत्री राणा गुरजीत देशाचे पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असू द्या, पण अपमान व्हायला नको होता. सभेला गर्दी झाली की नाही? हा त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे. पण पंतप्रधानांचा मार्ग अडवणे चुकीचे आहे. राज्याचे डीजीपी आणि गृहमंत्र्यांनी सुरक्षेची व्यवस्था करायला हवी होती. पंतप्रधानांसाठी सुरक्षित आणि पर्यायी मार्ग ठेवायला हवा होता. या प्रकरणात सुरक्षेत झालेल्या चुकीची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. यामुळे पंजाब सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून चर्चा करावी, अशी मागणी मंत्री राणा गुरजीत यांनी केली आहे. ‘डीजीपींना इथे तळ ठोकायला हवा होता’ शेतकऱ्यांचा विरोध ठीक आहे. पण पंतप्रधानांना जाण्यासाठी वेगळा आणि सुरक्षित मार्ग देणे हे डीजीपींचे कर्तव्य आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल तर डीजीपींना तिथे उपस्थिती लावावी लागते. आता फरीदकोट आणि फिरोजपूरच्या एसएसपींना निलंबित करण्याची चर्चा आहे. पण या सर्व प्रकरणाला डीजीपी जबाबदार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी चौकशी नेमून कारवाई करावी. पंतप्रधान हा कोणत्याही एका पक्षाचा नसून संपूर्ण देशाचा असतो, असे काँग्रेसचे आमदार परमिंदर पिंकी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात सुरक्षेत झालेल्या चुकी प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. रॅलीच्या ठिकाणापासून सुमारे ८ किमी अंतरावर असलेल्या उड्डाणपुलावर पंतप्रधानांच्या ताफ्याला थांबवावे लागले. तिथे ते सुमारे २० मिनिटे थांबून होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यासंदर्भात अहवाल मागवला असल्याचे सांगितले. असा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि त्यात जबाबदारी निश्चित केली जाईल, असे अमित शहांनी ठणकावले आहे. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कोणतीही आणि चूक झाली नसल्याचा दावा केला आहे.