शिंगणे महाविद्यालयात दामिनी पथकाकडून मार्गदर्शन
खामगांव : स. म. स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय खामगाव येथे सत्र 2021-22 मध्ये स्थानिक तक्रार निवारण समितीतर्फे दामिनी पथक खामगाव यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. निलीमा देशमुख, दामिनी पथक खामगाव येथील अशोक सुर्वे, अनिता गायके, निर्गुणा सोनटक्के, डॉ. हर्षा ढाले प्रामुख्याने उपस्थित होते.
स्थानिक तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. हर्षा ढाले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख मार्गदर्शक अशोक सुर्वे यांनी विद्यार्थ्यांनी इतरत्र लक्ष केंद्रित न करता अभ्यास हेच आपले ध्येय ठेवावे तरच जीवनात आपण प्रगती करू शकतो असे प्रतिपादिले.तर अनिता गायके यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण आणि त्यातून अभ्यासामध्ये येणारे अडथळे याविषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.निलीमा देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी आपल्यातील आत्मविश्वास, धैर्य जागे ठेवून स्वसंरक्षणाचे धडे अवश्य आत्मसात करून घ्यावे. तसेच समाजाची स्त्रियांकडे पाहण्याची वृत्ती, मानसिकता बदलणे गरजेचे आहे. यासाठी स्वतःपासून सुरुवात करणे महत्वाचे आहे हे विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. सूत्रसंचालन कु. पुनम माळवंदे तर आभार सुहास तायडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. अलका काळणे, प्रा. शालू लांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.