बोरद येथे उष्माघात कक्षाची स्थापना
बोरद (योगेश गोसावी) सध्या तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघात होण्याची शक्यता अधिक असून रुग्णांचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता जास्त आहे. ही सर्व बाब लक्षात घेता बोरद आरोग्यवर्धिनी केंद्रात उष्माघात कक्ष स्थापित करण्यात आला असून तेथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उन्हामुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते त्यासाठी ओ.आर.टी. कॉर्नर देखील सुरू करण्यात आला आहे.
बोरदर परिसर म्हटला म्हणजे याठिकाणी साधारणतः ३६ खेड्यांचा समावेश होत असतो .दररोज या ठिकाणी संबंधित खेड्यातील नागरिक सामान घेण्यासाठी किंवा विविध बाजार करण्यासाठी येत असतात. अशा परिस्थितीत उन्हाची तीव्रता जर पाहिली तर आजच्या घडीला पारा ४२ ते ४३ अंशाच्या घरात आहे. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण खूपच वाढले आहे. अशा परिस्थितीमध्ये बाजारात फेरफटका मारत असताना काही लोकांना उष्माघात होण्याची दाट शक्यता असते किंबहुना ह्या उष्माघाताने रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
ही बाब लक्षात घेता बोरद येथे आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अरुण लांडगे तसेच पंकज पावरा यांनी बोरद गावांमध्ये असलेले नागरिक त्याचबरोबर परिसरातील खेड्यातून येणारे नागरिक यांना उष्माघाताचा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अथवा झाल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत या हेतूने बोरद आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाच्या त्रासामुळे बेजार झालेल्या रुग्णांना या ठिकाणी औषधोपचार मिळणार आहेत. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने काही रुग्णांना याठिकाणी डीहायड्रेशन चा पण त्रास होऊ शकतो ही बाब लक्षात घेता या ठिकाणी ओ. आर. टी. कॉर्नर देखील सुरू करण्यात आला आहे.
आज सकाळी बऱ्याच नागरिकांना त्याच बरोबर रुग्णांना जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता उद्भवल्यास किंवा शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा उष्णतेमुळे त्रास जाणवल्यास त्यांना त्या परिस्थितीमध्ये ओ. आर.एस. घेण्यास सांगण्यात येते हे घरच्या घरीही बनवता येऊ शकते. याबाबतचे प्रशिक्षण आणि त्यासाठी लागणारे साहित्य याबाबतची माहिती संबंधित नागरिकांना याठिकाणी देण्यात आली.
यावेळी बोरद आरोग्यवर्धिनी केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अरुण लांडगे,डॉ.पंकज पावरा, मंगेश पाटील, अरुणा चौधरी, भारती पवार, प्रियंका पेंढारकर, संदीप शेलार, दिपक बेहरे, विकास पाडवी, तसेच आरोग्य कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.