शिर्डीच्या मंदिरासंबंधी मुस्लिम समाजाची मोठी मागणी ; नेमकी काय केली मागणी ?
शिर्डी : राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच शिर्डीतील मुस्लीम समुदायाने शिर्डीच्या मंदिरासंबंधी मोठी मागणी केली आहे. भोंगा वादामुळे मशिदींमधील पहाटेची अजान बंद झाली असली तरी साईबाबांच्या मंदिरातील स्पीकरवरून होणारी काकड आरती थांबवू नका, अशी विनवणीच शिर्डीतील मुस्लीम समुदायाकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत मंदिर किंवा मशिदीवर भोंगे वाजवले जाऊ नये, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या ३ मे च्या अल्टिमेटमनंतर राज्यभरात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, अनेक ठिकाणी भोंगे बंद करण्यात आले. शिर्डीमध्येही मशिद आणि मंदिरांवरील भोंगे बंद करण्यात आले होते. त्यामुळे साई मंदिरातील पहाटेच्या काकड आरतीसाठी लाऊडस्पीकरवर वापरण्यात आले नाही. दरम्यान, आता मुस्लीम समुदायाने पुढाकार घेत साई मंदिरातील काकड आरतीसाठी लाऊडस्पीकर वापरण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.
साई मंदिरावर भोंगे लावण्यात आले असून त्यातून दररोज काकड आरती आणि शेजाआरती होते. परंतु मनसेच्या आक्रामक भूमिकेनंतर मशिदीसह मंदिरांवरील भोंगे बंद करण्यात आले होते. त्यामुळे मुस्लीम समुदायाने पुढाकार घेत आम्ही पहाटेच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरणार नाही, परंतु साई मंदिरावरील काकड आरती आणि शेजारती भोंग्यावरून करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीन इनामदार यांच्यासह मुस्लीम समुदायातील काही लोकांनी प्रशासनाला यासंदर्भात निवेदन दिलं आहे.