नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये स्फोट ; नाशिकवरुन पार्सल आल्याची माहिती
नागपूर : शहरातल्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये आज संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास एक स्फोट झाला आहे. नाशिकवरून एक पार्सल वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी पाठवण्यात आलं होतं. तेच पार्सल नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसच्या पार्सल हबमध्ये पोहोचल्यानंतर कर्मचारी त्याला हाताळत असताना त्यामध्ये छोटा स्फोट झाला.
या स्फोटाची माहिती पोलिसांना देण्यात आली. सीताबर्डी पोलीस स्टेशनचं पथक तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. ते पार्सल तपासण्यात आले असता त्यामध्ये शेतावर किंवा जंगलात जनावरांना पळवण्यासाठी जे अल्प ते मध्यम प्रतीचे स्फोटक वापरले जातात ते सापडलं. नाशिक मधील एका अधिकाऱ्याने वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी हे पार्सल पाठवले होते. पोलिसांनी संबंधित स्फोटकं जप्त केली असून ते पार्सल कोणत्या उद्दिष्टाने पाठवण्यात आले होते त्याचा तपास सुरू केला आहे.
विशेष बाब म्हणजे नागपूर ते जनरल पोस्ट ऑफिस सिविल लाइन्स परिसरात असून जवळच विभागीय आयुक्त कार्यालय आणि मंत्र्यांचे बंगले असलेलं रविभवन हे सर्किट हाऊस आहे. तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घरही जनरल पोस्ट ऑफिस पासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे अशा व्हीव्हीआयपी ठिकाणी परिसरात स्फोट होणं नक्कीच गंभीर बाब आहे.