आता घर विकताना किंवा भाडेतत्वावर देताना ‘या’ परवानगीची गरज नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : घरमालक आणि खरेदीदार यांच्यात घराचा किंवा फ्लॅटचा व्यवहार झाला असेल तर काही परवानगीची आता गरज लागणार नाही. त्यामुळे घरमालकांना येणाऱ्या अडचणीपासून सुटका होणार आहे. याबाबत महत्त्वाची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awahad) यांनी केली आहे.
घर मालकाचा स्वतःच्या घरावर पूर्ण हक्क असतो. तो त्याचे ते घर कोणाला विकावे हा त्याचा निर्णय असतो. घरमालकाला त्याचा फ्लॅट विकायचा असेल तर कोणाला विकावा किंवा भाडेतत्त्वावर देण्यासाठी तो कोणाला द्यावा, यासाठी आतापर्यंत संबंधित सोसायटीच्या NOC (Non Objection Certificate) ची आवश्यकता होती.
जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या माहीतीनुसार, जर एखाद्या घरमालकाला घर, फ्लॅट विकायचा असेल, तर त्यांना सोसायटीची यापूर्वी लागणारी परवानगी आता आवश्यक नसणार आहे. आता अशी परवानगी घेतली नाही तरी चालणार आहे. मात्र ‘एखाद्या घरमालकाने आपली काही थकबाकी बाकी आहे का पाहावे आणि ती नसेल तर त्यासंबंधी एनओसी पत्र काढून घ्यावं. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तपास करत असतात, असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
तसंच घरमालक स्वतःचे घर फ्लॅट विकताना, तो ज्याला ते विकतोय तो खरेदीदार आणि घरमालक यांच्यातला हा व्यवहार असतो. त्यामुळे घर विकणाऱ्यास अथवा भाड्याने देण्यासाठी त्याकरता सोसायटीच्या परवानगीची गरज कशासाठी आहे? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला. घर मालक आणि खरेदीदार यांच्यात व्यवहार झाला तर परवानगीची काहीच गरज नाही, अस त्यांनी म्हटलंय.
दरम्यान काही महत्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा त्यांनी लक्ष केंद्रित केलं. राज्यात काही ठिकाणी भाडेकरू अथवा खरेदीदार आपल्या जातीचा आहे का नाही, हे पाहूनच घराचा, फ्लॅटचा त्याच्याशी व्यवहार केला जातो. विशेष म्हणजे खरेदीदार किंवा भाडेकरू शाकाहारी आहे की मांसाहारी हे देखील सध्या खूप पाहिलं जातं. यामुळे महाराष्ट्र हा वेगवेगळ्या विभागांत विभागला जात आहे. मुंबई ही एकत्र राहिले पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे’ असं आव्हाड म्हणाले. तर हे आता थांबवलं गेलं पाहिजे, अशीही त्यांनी अप्रत्यक्षपणे इच्छा व्यक्त केली.