ठाणे येथे महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा उभारण्याची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
अमरावती (महेंद्रसिंग पवार) ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे अडीच लाखापेक्षा अधिक राजपूत समाज वास्तव्यास असून या समाजाची महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी आज नगरविकामंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली.ठाणे शहरात लवकरच हा पुतळा उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ठाणे घोडबंदर रोड येथे राजपूत समाज सेवा संघ आयोजित युवक युवती परिचय संमेलन आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी समारोप भाषणात एकनाथ शिंदे यांनी राजपूत समाजाच्या मागणीनुसार लवकरच महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासाठी पावूल उचलणार असल्याचे घोषित केले. राजपूत समाज सेवा संघ ७वे युवक युवती परिचय संमेलन प्रसंगी आमदार रवींद्र फाटक, पाचोरा विधानसभा आमदार किशोर पाटील, माजी मंत्री जयकुमार रावल आदी उपस्थित होते.
ठाणे शहरात महाराणा प्रताप पुतळा होण्याची अपेक्षा आहे असे आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केल्यावर ही घोषणा करण्यात आली. याबाबत आमदार रवींद्र फाटक किशोर पाटील आणि राजपूत समाज सेवा संघ पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेवून मागणी केली होती. मुंबई मनपाचे स्थायी समिती सभापती यशवंत जाधव यांनी मुंबई शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला त्याच धर्तीवर ठाणे शहरात असा पुतळा उभारावा अशी मागणी करण्यात आली होती.समाजाचे अध्यक्ष आर.के.पाटील यांनी ही माहिती दिली.
विवाह संस्था अबाधित ठेवण्यासाठी वधू वर मेळावा आयोजित केले जातात. गावातील लोकांना अशा मेळाव्याचा उपयोग होतो. हे मेळावे आवश्यक आहेत. संपर्कासाठी या मेळाव्याचा अधिक उपयोग होतो. या मेळाव्यातून चांगल काही तरी घडत असते. सामूहिक विवाह सोहळा याचेही महत्व एकनाथ शिंदे यांनी विषद केले. नवीन पिढी जोडण्याचे काम आपण यानिमित्ताने करतो.शिवाजी महाराज व महाराणा प्रताप दैवत हे असून, गडकिल्ले आणि त्याची स्थापत्य शैली आश्चर्य चकित करणारी असून कल्याण प्रांतात शिवरायांचे आरमार होते त्याठिकाणी देखील भव्य स्मारक उभारण्यात येत असल्याची माहिती मा. ना. एकनाथ शिंदे यांनी दिली. राजपूत समाज अनेक ठिकाणी विखुरलेला आहे. यामुळे यासाठी पुतळा उभारला जाईल, असे स्पष्ट करत सरकारच काम जो पाठपुरावा करेल त्याच्या पदरात पडेल. असेही त्यांनी सांगितले.
या संमेलनात मुंबई महानगर प्रदेश विकास क्षेत्रातील तीनशे पेक्षा अधिक विवाह इचुक तरुण तरुणी उपस्थित होते. एकमेकांशी परिचय करून देत या तरुणांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल यांनी संबोधित करताना शिक्षण व्यवसाय यातील बदलावर माहिती देताना मुंबई परिसरात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्या साठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. काळानुरूप होणाऱ्या बदल नुसार आता तरुणांची अभिरुची बदलत असल्याने विवाह संस्थांच्या आमूलाग्र बदल स्वीकारत अश्या संमेलनाची गरजही अभिप्रेत असल्याचे रावल यांनी सांगीतले.महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन आमदार रवींद्र फाटक यांनी दिले. या संमेलनात विदेशात कार्यरत असणाऱ्या तरुणांनी हजेरी लावली.अर्थाजन करण्यासाठी विदेशात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असणाऱ्या तरुणांनी आपल्या अपेक्षा यावेळी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता ठाण्याच्या राजपूत समाज सेवा संघ, युवा संघ महिला संघटक आणि वधू-वर परिचय संमेलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. वधू-वरांचा परिचय व त्यांच्या नावाचे वाचन प्रा.सुवर्णा राजपूत, आशाताई राजपूत, जयश्री राजेश सोलंकी, उज्ज्वला पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा देवरे, कोमलसिंह पवार यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन आर.के.पाटील यांनी केले.