नाशिक (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांमागून वादग्रस्त वक्तव्ये करून राजकारणात राळ उडवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करून त्यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे.
नाना पटोले म्हणाले, “जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारण्याचं काम सुरू आहे. जगाच्या पाठीवर आपल्या देशाची ओळख बेरोजगारांचा देश अशी झालीय. महागाई मोठ्या प्रमाणात वाढलीय. सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालंय. शेतकऱ्यांचे प्रश्न आज मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्रातील सरकार सपशेल अपयशी झालेलं सरकार आहे.” भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर हायकमांडने झापल्यावर गावगुंड समोर आणला असा आरोप केला. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “गावगुंडाला गावगुंड दिसणार आहे. ते आता त्यांना दिसतच आहे. त्यांची कशी अवस्था झालीय हे सर्वांना माहिती आहे. लोकं भाजपावाल्यांवर हसत आहेत. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं. असं झाल्यानंतर काय बाकी राहिलं आहे.”
“भाजपाला बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, छोट्या उद्योजकांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न यासाठी निवडून दिलंय. त्यावर त्यांनी लक्ष द्यावं,” असा सल्ला नाना पटोले यांनी भाजपाला दिला. भाजपाने पटोलेंवर पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. यावर बोलताना पटोले म्हणाले, “आम्ही महात्मा गांधींच्या विचाराची लोकं आहोत. त्यामुळे हे विचार काँग्रेसच्या मनात कधी येऊ शकत नाही. ते विचार त्यांच्याच डोक्यात येऊ शकतात.”