मुंबई बँकेत भाजपाच्या वर्चस्वाला हादरा, प्रवीण दरेकर यांचं अध्यक्षपद गेलं
मुंबई (प्रतिनिधी) मुंबई बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपाला मोठा हादरा बसला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांना अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. प्रवीण दरेकर यांच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादीने युतीची घोषणा केली. निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार दोन्ही पक्षांच्या मुंबै बँकेतील प्रतिनिधींची बैठक झाली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे त्यांची सदस्य संख्या ११ झाली तर भाजपकडे आता ९ संचालक आहेत. त्यामुळे प्रवीण दरेकर यांचा पराभव अटळ होता. पराभव दिसताच प्रवीण दरेकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत प्रसाद लाड यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा हा मास्टरस्ट्रोक चांगलाच यशस्वी ठरला. मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिध्दार्थ कांबळे विजयी झाले.
सिद्धार्थ कांबळे यांना ११ तर प्रसाद लाड यांना ९ मत असं असलं तरी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचं एक मत फुटलं. यामुळे उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे विठ्ठल भोसले विजयी झाले आहेत. तर सेनेच्या अभिषेक घोसाळकर यांना पराभव स्विकारावा लागला आहे. शिवसेना आमदार सुनिल राऊत आणि शिल्पा सरपोतदार यांना महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.