माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्यात याव्यात !
धुळे (करण ठाकरे) इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी मंडळाने शाळा तेथे केंद्र ही संकल्पना अमलात आणली असून, परीक्षेच्या वेळेतही बदल केलेला आहे. त्यामुळे उर्वरित वर्गांची शाळा सकाळ सत्रात भरविण्यात यावी, अशी मागणी धुळे महानगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलेली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आता उन्हाचा तडाखा ही वाढलेला असून, एसटी बसेस बंद असल्याने ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी-विद्यार्थिनी भरदुपारी पायी चालत शाळेत येत आहेत.अशा परिस्थितीत ऐन परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर काही विपरित परिणाम होऊ नये म्हणून इयत्ता ५ वी ते९ वी व इ. ११ वीचे वर्ग २ मार्चपासून सकाळ सत्रात भरविण्याबाबत आदेश पारीत व्हावेत, जेणेकरून जिल्ह्यातीलसर्व शाळांमध्ये सुसूत्रता राहील. निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष व्ही. टी. गवळे, उपाध्यक्ष हर्षल पवार, युसूफ अन्सारी, वर्षा भामरे, मनोजकुमार मोरे, शीतल कापुरे, कानिफनाथ सूर्यवंशी, संदीप शेलार, महेश माळी, जे. बी. सोनवणे, गुलाबराव वाघ, संजय पवार, एस. डी. पाटील, एस. एस. बाविस्कर, विकास सोनवणे उपस्थिती होती. लवकरच निर्णय : देसले माध्यमिक शिक्षक संघाने शाळा सकाळच्या सत्रात सुरू कराव्यात या संदर्भात निवेदन दिले आहे. या बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी सांगितले.



