राजकीय भूमिका घेतल्यानं किरण मानेंना ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढलं ; सोशल मीडियावर चाहते आक्रमक
मुंबई (प्रतिनिधी) छोट्या पडद्यावरील मुलगी झाली हो या मालिकेला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत अभिनेता किरण माने हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते. किरण हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या ते त्यांच्या राजकीय भूमिका देखील सोशल मीडियावर मांडत आहेत. किरण यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे. पण किरण यांचा आरोप आहे की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आलं आहे.
आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या शब्दांमध्ये किरण मानेंनी मांडलेली मतं पोस्टच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. या पोस्टवरुन अनेकदा त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केला जातो. त्यांचीही पोलखोल किरण माने करत असतात. मात्र अशाप्रकारे राजकीय भूमिका घेणं त्यांना महागात पडल्याचं चित्र दिसत आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.
किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत. किरण मानेंनी एका दैनिकाशी बोलताना, “होय, मला मालिकेतून काढून टाकले आहे. मला तासाभरापूर्वीच चॅनेलने ही माहिती दिली,” असं म्हटलंय. किरण मानेंनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.
सोशल मीडियावर किरण मानेंविरोधात वाहिनीने केलेल्या कारवाईवरुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेक चाहत्यांनी उघडपणे किरण मानेंना या प्रकरणामध्ये पाठिंबा दर्शवलाय. अनेकांनी या कारवाईला संस्कृती दहशतवाद असं म्हटलंय. “राजकीय भूमिका घेतल्याने आपल्या सर्वांचे लाडके किरण माने सरांना यांना स्टार प्रवाहाने मालिकेतून काढून टाकले आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद नाही का..?,” असा प्रश्न तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारा खास रे या फेसबुक पेजवरुन विचारण्यात आलाय. “जो माणूस वास्तव आणि न्यायाच्या बाजूने उभा राहतोय,जो माणूस तुमच्या आमच्या हक्कासाठी इथ उघडपणे व्यक्त होतोय, ज्यावेळी गरज असते त्यावेळी इतर कलाकार गप्प बसलेले असताना हा माणूस तुमचा माझा आवाज बनून आपली लेखणी आपल्यासाठी झिजवतो आहे…त्या माणसासाठी आता आपण सर्वांनी उभे राहायची गरज आहे,” असंही या पोस्टमध्ये म्हटलंय.