तळोदा येथील अमरधाम येथील नाल्याला लागून असलेल्या पुलाला संरक्षक कठडे बसविण्याची मागणी
तळोदा (दिपक गोसावी) तळोदा शहरालगत असलेल्या तळोदा शहादा रोड वरील अमरधाम येथिल पुलाचे संरक्षक भिंतीचे पाईप गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तुटलेले आहेत. परंतु सदर पुलाकडे संबंधित विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष करून अपघात होण्याची जणू प्रतिक्षाच सार्वजनिक बांधकाम विभाग पहात आहे की काय असे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंकलेश्वर, बऱ्हाणपूर महामार्गावर तळोदा, शहादा रस्त्यावरील अमरधाम जवळील पुलाचे संरक्षक पाईप व भिंत तुटली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतीत लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येते याकामी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश दादा पाडवी यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. तळोदा शहराजवळच अमरधाम असल्याने तळोदा, चिनोदा, आमलाड, तळवा, मोड, प्रतापपूर, या ग्रामीण व शहरातील नागरिक सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंत्यविधीसाठी वाहन आणून रस्त्याच्या कडेला उभे करीत असतात व अंत्यसंस्कारासाठी आलेली माणसे रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या कडेला उभे राहत असतात. त्यामुळे सुसाट वेगाने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बऱ्याच वेळी असे छोटे-मोठे अपघात होताना वाचले आहेत. यापुढे तरी मोठी दुर्घटना होण्याची वाट न पाहता डोळ्यावर पट्टी बांधून बघ्याची भूमिका न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलाचे संरक्षक भिंतीचे काम मार्गी लावण्याची अपेक्षा तळोदा व आमलाड येथील रहिवाशी करीत आहेत. रस्त्याच्या पुढे जाऊन आमलाड पुलाचा ही स्लॅब उखडून मोठ मोठ्या सळ्या बाहेर निघाल्या असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदर पुलाचे कामात आमलाड येथील पुलाचे कामहि करण्याची मागणी तळोदा व आमलाड येथील रहिवाशी करीत असून मोठा अपघात होऊन जीवितहानी होणार नाही याची खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी व मोठा अपघात होण्याची वाट पाहू नये व युद्ध पातळीवर काम सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.