राजकीय

गंगेत प्रेते वाहून गेली तसे हे सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल ; शिवसेनेचा भाजपवर घणाघात

मुंबई : “ईडी, सीबीआयचे महाराष्ट्रासारख्या राज्यांतील छापे हा आता गमतीचा विषय बनला आहे. अनिल देशमुख यांच्यावर दोनशेच्या वर छापेमारी करून काय मिळवले? नवाब मलिक यांच्या बाबतीतही ‘वडाची साल पिंपळाला’ चिकटवण्याचेच काम सुरू आहे. परबांचे ‘सांडपाणी’ हे तर वेगळेच प्रकरण आहे. हे असेच चालू राहिले तर गंगेत प्रेते वाहून गेली तसे हे सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल. चंद्रकांत पाटलांच्या भाषेत ‘मसणात जाईल’, हे लिहून ठेवा”, असा घणाघात शिवसेनेच्या सामनातून भाजपवर करण्यात आला आहे.

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरी व मित्रपरिवाराकडे गुरुवारी सकाळपासून ‘ईडी’ नामक केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी छापेमारीच्या नावाखाली गेले. त्यांनी म्हणे परबांची 12 तास चौकशी केली. गेले काही दिवस, नव्हे काही महिने दापोलीतील साई रिसॉर्टशी परबांचे नाव जोडले गेले. परब यांचा कागदोपत्री पक्क्या पुराव्यांसह दावा आहे की, संबंधित रिसॉर्टशी त्यांचा संबंध नाही. तरीही त्याविषयी ईडी, केंद्रीय पर्यावरण खात्याकडून अनेक बाबतीत नियमभंग झाल्याचा बोभाटा करून परबांना ‘टार्गेट’ केले जात आहे हे आता स्पष्टच दिसते. ईडीची बारा तासांची छापेमारी संपल्यावर परब पत्रकारांना सामोरे गेले व म्हणाले “ज्या रिसॉर्ट प्रकरणावरून माझ्यावर छापेमारी केली ते माझे नाही. माझे मित्र कदम यांचे आहे. रिसॉर्टमधून समुद्रात सांडपाणी जाते असा गुन्हा केंद्रीय पर्यावरण विभागाने दाखल करून ईडीने मला लक्ष्य केले. यात तुमचे ते मनी लॉण्डरिंग वगैरेचा विषय येतोच कोठे?’’ परब यांच्या म्हणण्यानुसार संबंधित रिसॉर्ट अद्याप सुरूच झाले नाही, मग सांडपाणी समुद्रात जाईलच कसे? रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात गेले यावर संशोधन करून ईडीने छापे मारले हे नवलच आहे. असं टीका सामनातून करण्यात आली आहे.

“ईडी योगी आदित्यनाथांवर छापे मारणार का?”

“कोविड काळात गंगेत सांडपाणी नाही, तर सडकी प्रेते हजारोंनी वाहत होती. त्यामुळे मानवी जिवांचा आणि गंगेच्या पर्यावरणाचा प्रचंड नाश झाला. दापोलीतील रिसॉर्टच्या सांडपाण्यापेक्षा… आता गंगेत प्रेते वाहू लागल्याने प्रदूषण झाले याबद्दल ईडी योगी आदित्यनाथांवर छापे मारणार का? केंद्रीय तपास यंत्रणांच्या सध्याच्या कारवाया या सरळ सरळ एकतर्फी व अधिकाराचा गैरवापर करणाऱया आहेत. भाजपचा एक बोबडा विझलेला फटाका ईडी, सीबीआयच्या नावे धमक्या देतो व त्याबरहुकूम कारवाया घडतात. आज याच्यावर छापे पडतील, उद्या त्याच्यावर धाडी पडतील, परवा त्यास तुरुंगात जावे लागेल असे इशारे दिले गेले व केंद्रीय यंत्रणांची विश्वासार्हता कमी करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे विद्यमान भाजप सरकारच्या हातातले कळसूत्री बाहुलेच बनले की काय?” असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे.

“देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास मींरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केला. सध्या तरी प्रकरण आठ-दहा कोटींचे आहे, पण भ्रष्ट व अवैध मार्गाने जमिनी ताब्यात घेऊन त्यावर एक सप्ततारांकित क्लब या महाशयांनी उभा केला व त्यात भाजपच्या बडय़ा नेत्यांची भागीदारी (अर्थात छुपी) असल्याचे बोलले जाते. तो सगळा विषय बाहेर येतच आहे, पण भ्रष्टाचारविरोधी गुन्हा दाखल होताच हे नरेंद्र मेहता त्यांच्या पत्नीसह ‘फरार’ झाले व आता म्हणे त्यांना मुंबईच्या हायकोर्टाने अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे”.

“त्याआधी विक्रांत निधी अपहार घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्या मुलासह फरार झाले व पुढे त्यांना अटकेपासून दिलासा देण्यात आला. गुन्हा दाखल होताच फरार व्हायचे व चार-पाच दिवसांत अटकेपासून दिलासा ‘गोळी’ घेऊन प्रकट व्हायचे हेच सध्या सुरू आहे. ईडी, सीबीआयच्या छापेमारीप्रमाणेच हे ‘दिलासा’ प्रकरणही संशोधनाचाच विषय आहे. विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा न्यायव्यवस्थेत भरणा होत आहे असा एक आरोप केला जातो. त्याच विचारसरणीच्या लोकांसमोर हे ‘दिलासा’ खटले चालवून हवे तसे निकाल घेतले जात असल्याची कुजबुज आज देशभरात सुरू आहे. हे सत्य असेल तर देशाच्या न्यायव्यवस्थेचा स्तंभही वाळवीने पोखरला गेलाय असेच म्हणावे लागेल”. असा घणाघातही सामनातून भाजपवर करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे