इंदिरा गांधींशी तुलना करुन त्यांच्याप्रमाणेच मोदींचं व्हावं अशी अपेक्षा करत आहात का? : चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीला जाऊन मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसोबतच वेगवेगळ्या मुद्द्यावंर भाष्य केलं.
नाना पटोले यांनी पंजाबमध्ये जे काही झालं ते नौटंकी असल्याचं म्हटलं असून इंदिरा गांधी आणि मोदींची तुलना होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “तुलना कोणाचीच कोणाशी होत नाही. पण इंदिरा गांधींशी तुलना करुन त्यांच्याप्रमाणेच मोदींचं व्हावं अशी अपेक्षा करत आहात का? आपण काय बोलतो, त्याचा काय अर्थ लागतो याचा आपल्याला तरी पत्ता असतो का. नौटंकी तर तुम्ही करत आहात..विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा देता, राज्याचे अध्यक्ष होता, मंत्रिमंडळाची इच्छा व्यक्त करता”.
उद्धव ठाकरेंना आयती थाळी मिळाल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी बाळासाहेबांनी भाजपाला राज्याची आयती थाळी दिली आहे असं म्हटलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांचं इतिहासाचं ज्ञान कमी तरी आहे किवा ते वेड पांघरत आहेत. शेवटी भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली. अगदी भाजपाची स्थापना १९८० मध्ये झाली. ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली तेव्हा देशातील नऊ राज्यांमध्ये एकत्रित का असेना पण सरकार आलं होतं. त्यामुळे कोणी कोणाला मोठं केलं हे सर्व जगाला माहिती आहे”.
“उद्धव ठाकरेंनी कधी पालिकेचीही निवडणूक लढवली नाही हेदेखील खरं आहे. ज्या मुंबई शहरात २० वर्षांपासून त्यांचं राज्य आहे तिथेही निवडणूक लढण्याची हिंमत दाखवली नाही. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा निवडणूक लढवली नाही. त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेबांची पुण्याई आहेच..त्याच्याच आधारे त्यांना आयती थाळी मिळाली हे माझं मत आहे,” असं ते म्हणाले.