‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कटप्पासारखा रोल” : रवी राणा
अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कटप्पा सारखा रोल असल्याची टीका आमदार रवी राणा यांनी केली आहे. दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी राणा दाम्पत्यावर 341,135,291,143 हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नावावर मते मागितली त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसलं, अशा शब्दात रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कटप्पाचा रोल करत आहे अशी टीका रवी राणा यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी संभाजी राजे यांना धोका दिला असा आरोपही त्यांनी केला. जे छत्रपतींचे झाले नाही ते महाराष्ट्राचे कसे होणार अशी टीका त्यांनी केली.
राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल
नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी राणा दाम्पत्यावर 341,135,291,143 हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या नोटीस नंतर जामिनाची प्रक्रिया सुरू करू असं राणा यांचे वकील ॲड दीपक मिश्रा यांनी सांगितलं आहे. सर्व गुन्हे बेलेबल असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे.
राणा दाम्पत्य अमरावतीत दाखल, ठिकठिकाणी जंगी स्वागत
14 दिवस तुरुंगवास झाल्यानंतर राणा दाम्पत्य 36 दिवसांनी विदर्भात दाखल झालेत. अमरावतीत आगमन होताच राणा दाम्पत्यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.. याशिवाय ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण देखील करण्यात आले. यानंतर राणा दाम्पत्य त्यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री निवास्थानी पोहचल्यानंतर दाम्पत्याचा कार्यकर्त्यांकडून दुग्धभिषेक सोहळा पार पडला. यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दोघांना सोबत बसवून दुग्धभिषेक करण्यात आला.राणा दाम्पत्य येथून नागरिकांच्या समस्या सोडविताना एक नवा संकल्प करून पुढील वाटचाल करणार असल्याचे राणा दाम्पत्यांनी सांगितलं आहे.