गोंदूर शिवारात शेतातून गाय गोहा आणि इलेक्ट्रिक मोटर चोरी
धुळे (विक्की आहिरे) नेहमीप्रमाणे शेतावरील खुंट्यास बांधलेली गाय व गोहा आणि इलेक्ट्रिक मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. यात या शेतकऱ्याचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. याबाबत गोंदूर येथील शेतकरी चंद्रकांत काशिनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी चंद्रकांत काशिनाथ पाटील यांचे गोराणे बायपास रोडवर निकम पॉलीटेक्निक कॉलेजच्या पाठीमागे गोंधळ शिवारात शेती आहे. ही शेती गावाजवळच असल्याने ते दिवसभर शेती करून गावात असलेल्या घरी वास्तव्यास असतात. नेहमीप्रमाणे बुधवारी चंद्रकांत पाटील हे शेतात आले असता त्यांना खुंट्यावर बांधलेली एक गाय व गोन्हा दिसून आले नाही. तसेच त्यांनी आणखी तपासणी केली असता त्यांना शेतातील इलेक्ट्रिक मोटर सुद्धा चोरी झाल्याचे लक्षात आले. यासंदर्भात चंद्रकांत काशिनाथ पाटील (वय ३८) यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पवार करीत आहे.