एसटी व कारचा अपघात ; अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू
धुळे (स्वप्नील मराठे) धुळे तालुक्यातील नवलनगरजवळ वणी गावाजवळ कार आणि राज्य परिवहन महामंडळाची बस यांच्यात २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या महिलेचा शनिवारी रात्री मृत्यू झाला आहे. मयत महिलेचे नाव नभाबाई दगडू कोळी असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. अपघातातील एका गंभीर जखमीवर उपचार सुरू असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.
एमएच २० बीएल ३५५७ क्रमांकची राज्य परिवहन महामंडळची बस चोपड्याकडून धुळ्याकडे येत होती. नवलनगरजवळ असलेल्या वणी गावाजवळ बस येताच समोरून येणारी एमएच १९ डीजे ८४४२ क्रमांकाच्या कार आणि बस यांच्यात समोरासमोर धडक बसली. अपघात इतका जोरात घडला होता की, यात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. बसच्याही पुढील भागाचे नुकसान झाले आहे.
अपघातात झाली कार चक्काचूर
कारमधील दोघांना मात्र गंभीर दुखापत झाली. अपघाताची घटना लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली कारमधील दोघांना बाहेर काढून त्यांना मिळेल त्या वाहनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच एकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते तर अन्य काही जखमींवर उपचार सुरू होते.
एकजण गंभीर जखमी
बसमध्ये बसून प्रवास करत असलेली नभाबाई दगडू कोळी या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु होते. गंभीर जखमी असलेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती धुळे तालुका पोलिसांनी दिली आहे. मात्र एकजण गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचे नाव मात्र अजूनही समजू शकलेले नाही.