कर्जत नगरपंचायतीवर रोहित पवारांनी मिळवली एकहाती सत्ता, राष्ट्रवादी १२ जागांवर विजयी
अहमदनगर (वृत्तसंस्था) कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीनं १७ पैकी १२ जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादीनं १२, काँग्रेसनं ३ तर भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या.
राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर येतोय. या निकालाच्या मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून मोठा धक्का बसताना दिसतोय. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी ज्या मतदारसंघात सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लावली होती त्या जागेवर भाजपचा पुन्हा पराभव झाल्याचं दृश्य आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं पुन्हा एकदा निर्विवाद असं वर्चस्व राहिलं आहे. कारण आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एकणू १७ जागांपैकी रोहित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत उमेदवारांचा ११ जागांवर विजय झाला आहे. तसेच एक जागेवर राष्ट्रवादीचा बिनविरोध विजय झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीने एकूण १२ जागांवरील विजय खिशात घातला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे या नगरपंचयातीत काँग्रेसलाही ३ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे कर्जतच्या नगरपंचायत निवडणुकीच महाविकास आघाडीचा तब्बल १५ जागांवर विजय झाला आहे.
कर्जतमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्यात समोरासमोर लढत होती. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मतदारसंघात येऊन ठाण मांडला होता. या दरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाला वेग आला होता. पण अखेर नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. राष्ट्रवादीने कर्जतमध्ये आतापर्यंत सतरापैकी १२ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपल्या अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
राष्ट्रवादी १२
काँग्रेस ३
भाजप २
आघाडीच्या १५ जागा.
राज्यातील १०६ नगरपंचायत आणि भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीला जास्त महत्त्व आहे. कारण या निकालाच्या पार्श्वभूमीवर जनतेचा नेमका कौल कुणाच्या बाजून आहे ते स्पष्ट होतं. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. तसेच राज्यभरातील जनतेचं या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीचा पहिला निकाल आता समोर आला आहे.