नाशिक (वृत्तसंस्था) राज्यात अपहरणाच्या घटना वाढत असून २५ हजार महिला, मुली गायब आहेत. महाराष्ट्रात नेमके चालले काय? भाजपच्या लोकांवर दणादण गुन्हे दाखल होतात, पण गुंडांवर – बलात्काऱ्यांसाठी आयपीसीचे कलम नाही का? असा सवाल उपस्थित करत गुंडांना, बलात्काऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडून अभय दिले जात असल्याचा आरोप भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, आदित्य ठाकरेंना शेंद्रीपाड्यात पूल बांधण्याची विनंती केली. शेंद्रीपाडा, सावरपाडा आणि परिसरातील आदिवासी महिला, बांधवांचे अन्य प्रश्नही सोडवण्याची गरज आहे. जिल्ह्यातील ५० टक्के आदिवासी बांधवांना खावटी योजनेचं अनुदान मिळालेलं नाही. नंदुरबार जिल्ह्यातही आदिवासी बांधवांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. एकट्या नंदुरबार जिल्ह्यात ३१ मातांचा असुरक्षित बाळंतपणात बळी गेला. या बालमृत्यू, माता मृत्यूंची जबाबदारी कुणाची, असा सवालही त्यांनी केला.
दिवसाढवळ्या अपहरण
वाघ पुढे म्हणाल्या की, राज्यात अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आजघडीला राज्यातून २५ हजार महिला आणि मुली गायब झाल्यात. हे पाहता प्रश्न पडतो की, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? आधी पोलीस आयुक्त गायब झाले, नंतर गृहमंत्री गायब झाले आणि आता मुख्यमंत्रीही गायब आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. नाशिकमध्ये दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जातेय, अपहरणाचा प्रयत्न होतो, पोलीस यंत्रणा कुठंय, असा तिखट प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.