राहुल गांधींचा नाईट क्लबमधील व्हिडीओ भाजपकडून व्हायरल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींचा एका पार्टीतील व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे. राहुल गांधी त्यांच्या खासगी दौऱ्यानिमित्त नेपाळला गेले आहेत. या व्हिडिओत राहुल गांधी हे आपल्या मैत्रिणीसोबत नाइट क्लबमध्ये दिसत आहेत.
राहुल गांधी हे आपल्या एका मैत्रिणीच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार राहुल गांधी यांची मैत्रिण सुमनिमा उदास ही एका आंतरराष्ट्रीय वृ्त्तसंस्थेत पत्रकार म्हणून कार्यरत होती. सुमानिमाच्या वडिलांनी नेपाळचे राजदूत म्हणून म्यानमारमध्ये जबाबदारी पार पाडली. राहुल गांधी यांच्यासह भारतातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती या विवाह सोहळ्यात दाखल होणार आहेत.
राहुल गांधींचा नाईट क्लबमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपशी संबंधित राजकीय नेते, उजव्या विचारसरणीला पाठिंबा असणाऱ्या युजर्सकडून टीकात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत असणारी महिला ही चीनची नेपाळमधील राजदूत असल्याचा दावा काहींनी केला आहे. तर, ही महिला राहुल गांधी यांची महाविद्यालयीन जीवनातील मैत्रिण असल्याचे दावा एका फोटोच्या आधारे केला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.