धनुरच्या ग्रामसेविकेसह पोलिस पाटील निलंबित
धुळे (करण ठाकरे) तालुक्यातील धनुर येथील ग्रामसेविका व पोलिस पाटील यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
धनुर गावात ग्रामपंचायतीसमोर गावठाण जागेवर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आला. ही बाब पोलिस पाटील संदेश रोहिदास पाटील यांनी वेळीच वरिष्ठांना निदर्शनास आणून न दिल्याने गावात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. त्यांनी सादर केलेला खुलासा असमर्थनीय व बचावात्मक स्वरूपाचा असल्याने अमान्य करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आल्याने त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश सहा. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. तसेच धनुरच्या ग्रामसेविका सुरेखा भिवसन ढोले या अनधिकृतपणे गैरहजर राहिल्या आहेत. दि. 19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असतांना तसेच राष्ट्रीय कार्यक्रम असल्याने जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करणे आवश्यक असतांना साजरी केली नाही. त्याचे काही नियोजनही केल्याचे दिसून आले नाही. गावातील घटनेबाबतही न कळविता कर्तव्यात कसूर केली. म्हणून त्यांनाही निलंबित करण्यात आहे. गटविकास अधिकारी वाघ यांनी हे आदेश काढले.