वाढत्या पेट्रोलच्या दराने ग्रामीण भागातील जनता हैराण
बोरद (योगेश गोसावी) गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल दरामध्ये सतत वाढ होत असल्याकारणाने ग्रामीण भागातील जनता होरपळून निघाली आहे. तळोदा तालुक्याला लागूनच गुजरात राज्याची सीमा तालुक्याच्या तीनही बाजूला लागून आहे.
महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आज तळोदा शहरात पेट्रोल चे दर ११४.२१ प्रतिलीटर झाले आहेत. गेल्या ८ दिवसांमध्ये साधारणतः ४.७५ रुपयांनी हे दर वाढले आहेत. त्यामानाने गुजरात राज्यात हे दर ९९.८७. प्रतिलीटर या प्रमाणे आहेत. यात दोन्ही राज्यात भावाची तफावत पहिली तर एकूण १४.३४ रुपयांचा फरक याठिकाणी जाणवतो आहे. त्यामुळे तळोदा तालुक्यातील बरेच वाहन धारक तळोदा ऐवजी पेट्रोल टाकण्यासाठी गुजरात राज्याला अधिक पसंती देत आहेत.त्यामुळे तळोदा तालुक्यातील पेट्रोल पंपांवरील पेट्रोल विक्रीवर परिणाम होतांना दिसून येत आहे.
तळोदा नंदूरबार रस्त्यावर हातोडा गावापासून अवघ्या ३ किलोमीटरवर गुजरात राज्याचा खाजगी कंपनीचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर महाराष्ट्रातील तळोदा तसेच ग्रामीण भागातील ग्राहक जास्त आहेत. जो तो पेट्रोल स्वस्त मिळत असल्यामुळे वाहनातील इंधन क्षमता पूर्ण करून घेत आहेत.एवढ्यावर ही न थांबता ग्रामीण भागातील काही ग्राहक २५ ते ५० लिटर क्षमतेचे ड्रम भरून घेऊन जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होतांना दिसून येत आहे. वाहनांच्या रांगाच रांगा नेहमी उभ्या असलेल्या दिसून येत आहेत. काही वेळा या ठिकाणी भांडणं ही होतांना आढळून येतात. जो तो आपला नंबर लावण्यासाठी प्रयत्न करतांना दिसतो. त्याचप्रमाणे अक्कलकुवा रस्त्यावर तळोदा पासून ६ किलोमीटरवर अंतरावर गुजरात राज्याचे आश्रावा हे गाव आहे. त्याठिकानीही पेट्रोल पंप आहे. याठिकाणी ही अशीच पारिस्थिती आहे.
तसेच प्रकाशा रस्त्यावर तळोद्या पासून १० किलोमीटर अंतरावर गुजरात राज्यातील पिसावर या गावीही खाजगी कंपनीचा पेट्रोल पंप आहे. पण या ठिकाणी नेहमी पेट्रोल नासल्याचाच बोर्ड आढळून येतो. त्यामुळे तळोदा तसेच ग्रामीण भागातील ग्राहक यांचा ओढा हातोडा तसेच आश्रावा येथील पेट्रोल पंपांनाच अधिक पसंती देतांना दिसून येतात.
वरील तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर गुजरात व महाराष्ट्र राज्यात भावातील फरक खूपच जास्त असल्याने साहजिकच ग्राहकांचा ओढा स्वस्त मिळेल तिथेच असेल.त्यामुळे महाराष्ट्राने ही भाव कमी करण्याबाबत विचार करावा अशी अपेक्षा ग्रामीण तसेच शहरी जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारच्या इंधन धोरणावरही ग्रामीणसह शहरी भागातील जनता नाराज असून यावर काहीतरी तोडगा काढावा, जेणेकरून काही प्रमाणात का असेना महागाईची झळ ही कमी होईल. अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.