गृहिणींना दिलासा : खाद्य तेलाच्या किमतीत घसरण
नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांनंतर आत देशांतर्गत बाजारात मोहरी, शेंगदाणा, सोयाबिन, पामोलिनसह सर्व खाद्यतेलाच्या किमतीत घसरण होताना दिसते आहे. परंतु परदेशात तेलाच्या किमती अद्यापही कमी झालेल्या नाहीत. देशांतर्गत बाजारात सोयाबीन, मोहरी, शेंगदाणा, पामोलिन यासह अनेक खाद्यतेलाच्या दरात प्रतिलीटर 7 ते 10 रुपयांची घसरण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी सरकारने पेट्रोल, डीझेलच्या दर कमी केल्यानंतर लगेचच त्यापाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती देखील कमी झाल्याने महागाईमुळे कोलमडलेल बजेट सुरळीत होत असल्याने सर्व सामान्य सुटकेचा निःश्वास सोडत आहेत. स्थानिक बाजारपेठांमध्ये तेलाची मागणी सोयाबीन, सरकी, भुईमूग, आणि मोहरीच्या तेलावर भागवली जात आहे. मात्र आता इंडोनेशियाकडून २३ मे पासून भारतावरील होणाऱ्या पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी काढल्याने सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या किंमती जवळजवळ १०० डॉलरने घसरल्या आहेत. यामुळे आयातीला सुरुवात झाली असून काहीच दिवसांत इंडोनेशियातून तेलाची आवक सुरळीतरित्या झाल्यास खाद्यतेलाच्या किंमती आणखी घसरतील, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.