डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी, फर्दापूर येथील रिसर्च इन्स्टिट्यूटच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करणार
-राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन
फर्दापूर ( विवेक महाजन,तालुका प्रतिनिधी ) फर्दापूर येथे जागतिक दर्जाचे शिवपार्क – भीमपार्क बाबत मंत्रालयात वेळोवेळी बैठक घेण्यात येत असून याबाबत च्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी जवळपास 100 कोटी रुपये अपेक्षित आहे. सदरील प्रस्तावाला तत्वतः मंजुरी मिळालेली असून फर्दापूर येथे जागतिक दर्जाचे शिवपार्क – भीमपार्कचे भूमिपूजन लवकरच होईल अशी माहिती देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी असून येथील रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली सेंटरच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
फर्दापूर येथे शुक्रवार ( दि.19 ) रोजी एक दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, पोलीस अधीक्षक निमित गोयल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव अनिल गायकवाड, लदाख येथून आलेले भीक्खू संघसेना महाथेरो, चौका येथील भदन्त बोधिपालो महाथेरो, सिल्लोडच्या नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम,उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, तहसीलदार रमेश जसवंत, माजी उपसभापती उस्मान पठाण, विलास डोळसे, मंगेश दहीवले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, जि. प. सदस्य गोपीचंद जाधव, नगरसेवक जितू आरके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जगात तिघांचे अस्तिव कायम आहे. एक सूर्य, दुसरे चंद्र आणि तिसरे सत्य . सत्य हे बौद्धांच्या विचारांमध्ये आहे. सत्याचा स्वीकार केल्यास माणसामध्ये परिवर्तन होते असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी असून बाबासाहेबांनी दिलेल्या मूलमंत्राचे आचरण करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना नसती तर माझ्या सारख्या अल्पसंख्याक समाजाचा माणूस मंत्री झाला नसता असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी फर्दापूर येथे समाज बांधवांच्या योगदानातून जमीन घेण्यात आली. येत्या आठ दिवसाच्या आत येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू, रत्याच्या प्रश्न मार्गी लागल्यानंतर येथे विकास कामांना गती येईल. येथील रिसर्च सेंटरला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 16 एकर जमीन हस्तांतरित करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा यासाठी शासनास पाठपुरावा करून मंजुरी देण्याचे काम करू असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
*——————————-*
अखिल भारतीय धम्म परिषद ऐतिहासिक जिल्ह्यात होत असल्याचे समाधान असून ज्या ठिकाणी आज परिषद होत आहे. येथे बौद्ध धम्माच्या संपन्नतेसाठी जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या बौद्धलेण्या साक्ष देत असल्याचे प्रतिपादन यावेळी पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. यावेळी मंत्री संजय बनसोडे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार विकास कामांसाठी कायम तत्पर असतात. त्यांच्याकडे विकासाची धमक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च च्या विकासासाठी ते पूर्ण मदत करतील असा विश्वास राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.
———————————————–
*मंत्र्यांचा साधेपणा; जमिनीवर बसून घेतला जेवणाचा अस्वाद*
या परिषदेत येणाऱ्या उपासक उपासिकांसाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली होती. धम्म परिषदेच्या कार्यक्रमानंतर महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जमिनीवर बसून येथील जेवणाचा आस्वाद घेतला.