राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुणे येथे घेतली मूर्तिकारांची भेट
फर्दापूर येथील शिवस्मारक भीमपार्कचे काम होणार गतिमान
सोयगाव (विवेक महाजन) फर्दापूर येथे उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारक – भीमपार्कच्या अनुषंगाने महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुणे येथील प्रसिद्ध मूर्तिकार, शिल्पकार, इतिहास तज्ञ, अभ्यासकांची भेट घेवून याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांची उपस्थिती होती.
दोन दिवसांपूर्वीच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे अजिंठा लेणीचा आढावा घेण्याच्या निमित्ताने फर्दापूर येथे आले होते. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील शिवस्मारक व भीमपार्क बाबत मंत्री आदित्य ठाकरे यांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुणे गाठत मूर्तिकारांची भेट घेवून येथील बनविण्यात येणाऱ्या मूर्ती व शिल्पांची पाहणी केल्याने शिवस्मारक – भीमपार्क उभारण्याच्या काम गतिमान होणार असल्याचे दिसत आहे.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुणे येथील शिल्पसिद्धी सकल्चर च्या मूर्तिकार सुप्रिया शिंदे तसेच शिल्प साधना आश्रम व चित्रकला आर्टचे दीपक थोपटे यांची भेट घेवून त्यांनी तयार केलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांची पाहणी करून याबाबत माहिती जाणून घेतली.
शिवस्मारक तसेच भीमपार्कच्या उभारणीसाठी मूर्तिकार व शिल्पकारांची भूमिका महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे स्मारक व्हावे यासाठी मूर्तिकार व तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी तसेच सदरील काम गतिमान व्हावे यासाठी पुणे येथील प्रसिद्ध मूर्तिकारांची भेट घेतली व त्यांनी साकारलेले महापुरुषांचे पुतळे विविध मूर्ती, कलाकृतीची पाहणी केली.
– राज्यमंत्री अब्दुल सत्तार