जि.प.च्या शंभर शाळांना प्रथमोपचार पेट्यांचे वितरण
पहूरच्या स्व. कडूबा वानखेडे बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम
जामनेर (ईश्वर चौधरी) पहूर येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते कडूबा वानखेडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्व. कडूबा वानखेडे बहुउद्देशीय संस्थेतर्फे तालुक्यातील शाळांना शंभर प्रथमोपचार पेट्यांचे वितरण करण्यात आले.

काल विविध शाळांमध्ये जाऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गोपाळ वानखेडे, उपाध्यक्ष गणेश राऊत, विश्वस्त शंकर भामेरे यांनी प्रथमोपचार पेट्या वितरीत केल्या. जिल्हा परिषद मराठी शाळेत झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप बावस्कर, अनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक श्रीकांत पाटील आणि एस. आर. कोळी यांना पेटीचे वितरण करण्यात आले. समाजऋण प्रत्येक व्यक्तीने जाणले पाहिजे असे मत कवी श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले. संस्थाध्यक्ष डॉ. वानखेडे म्हणाले, की माणूस म्हणून समाजात जगताना इतरांप्रती आपली बांधिलकी जोपासतो तोच खरा माणूस हीच विचारधारा नजरेसमोर ठेवून शिक्षण व आरोग्यक्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी सर्व शिक्षक – शिक्षीका उपस्थित होते.



