कपिल सिब्बल यांची काँग्रेसला सोडचिट्ठी ; सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जाणार
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षातील बदलांचा आग्रह सोडत वेगळा मार्ग चोखाळला आहे. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांनी समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.
समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरताना कपिल सिब्बल यांच्यासोबत सपाचे प्रमुख अखिलेश यादव देखील होते. यावेळी सिब्बल यांनी सांगितलं की त्यांनी १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सपाकडील आमदारांचं संख्याबळ पाहता कपिल सिब्बल राज्यसभेत निवडून जाणं निश्चित आहे.
कपिल सिब्बल यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर अखिलेश यादव म्हणाले, “समाजवादी पक्षाकडून ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आला आहे. ते सपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत जातील. राज्यसभेसाठी आणखी दोन नावांचीही लवकरच घोषणा होईल.”