रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेने महिलेचे प्राण वाचले
नंदुरबार (प्रतिनिधी) उधना ते नंदुरबार रेल्वेद्वारे प्रवास करीत असलेल्या एका महिलेला बुधवारी सायंकाळी बेशुद्ध अवस्थेत सहप्रवाशांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावर आल्यानंतर तात्काळ उपचार मिळाल्याने ज्येष्ठ महिलेचे प्राण वाचले.
याबाबत प्राप्त माहिती अशी की बुधवारी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास उधना ते नंदुरबार प्रवास करीत असलेल्या एका जेष्ठ महिला नंदुरबार रेल्वे स्थानकावर आल्यावर बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले. यावेळी काही सहप्रवाशांनी तात्काळ नंदुरबार रेल्वे स्थानकावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात आले. त्यानुसार तात्काळ रेल्वे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. स्वच्छता कर्मचारी यांनी सदर महिलेस स्ट्रेचरवर टाकून फलाट क्रमांक एक वर आणण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रवासी महिलेची तपासणी करून उपचार केले. वेळीच उपचार मिळाल्याने सदर महिलेचे प्राण वाचले. संबंधित महिलेच्या नातेवाईकांना कळवून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
सदर महिला सायंकाबाई संतोष महाले मु.लौंडर, तालुका शिरपुर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.नंदुरबार रेल्वे स्थानकावरील वाणिज्य व इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सदर महिलेचे प्राण वाचल्याने त्यांचे कौतुक होत आहे.