गावकऱ्यांनी आता एकत्र येवून जागेचा तिढा सोडवावा : अब्दुल सत्तार
अंभई येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला तीनवेळा मंजुरी मिळाली तसेच येथील ग्रामपंचायत कार्यालयाला देखील मंजुरी मिळालेली आहे. मात्र जागेच्या अभावी येथे कामाला अद्याप सुरुवात झाली नाही. गावकऱ्यांनी आता एकत्र येवून येथील जागेचा तिढा सोडवावा जेणे करून मार्च पूर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामाला सुरुवात होईल असे प्रतिपादन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अंभई येथे केले. येथील गावकऱ्यांनी जर जागेचा तिढा सोडविला नाही तर सदरील मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे नानेगाव येथे स्थलांतर करावे लागेल असे ही राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
अंभई येथील डॉ. अविनाश पाचोळे यांच्या साई हॉस्पिटलचे उदघाटन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते आज शुक्रवार ( दि.11 ) रोजी संपन्न झाले. यावेळी उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील मुख्य रस्त्यावरील काढण्यात येत असलेल्या अतिक्रमणाची पाहणी करून राहिलेले अतिक्रमण येत्या दोन – तीन दिवसात स्वतःहून काढून घेत शासनास सहकार्य करावे. नसता शासन आपल्या परीने कारवाई करून अतिक्रमण काढण्यासाठी सज्ज असल्याचे सांगत गावाचा विकास हा गावकऱ्यांच्याच हाती असून प्रत्येकाने आपले अतिक्रमण काढून घ्यावे व अतिक्रमणाची होणारी कारवाई टाकावी असे ही शेवटी राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता तालुक्यात आरोग्य सुविधेचे मोठ्या प्रमाणावर बळकटीकरण करण्यात आले आहे. कोरोना संकटात डॉक्टरांचे योगदान विसरता येत नाही असे स्पष्ट करीत ग्रामीण भागात शासकीय व खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून निर्माण होत असलेल्या आरोग्याच्या सुविधांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरित उपचार देणे शक्य होत असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले. सद्य परिस्थिती पाहता डॉक्टरांनी सवलतीच्या दरात रुग्ण सेवेचा लाभ दिला पाहिजे अशी भावना देखील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.
यावेळी कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, सतीश ताठे, माजी प.स. सभापती सुभाष गव्हाणे, रामदास दुतोंडे, उपसरपंच रईस देशमुख, माजी सरपंच रुद्राअप्पा नगरे, डॉ. हरिश्चंद्र वडोदे, डॉ. जुनेद देशमुख, डॉ. विजय पवार, नानेगावचे चेअरमन करीम पठाण, शिवसेना तालुका उपप्रमुख नानासाहेब रहाटे, ग्रा.प. सदस्य समाधान भुईगळ , जगन्नाथ जाधव, रत्नाकर गवंडरे, सय्यद मेहमूद, साई हॉस्पिटलचे विठ्ठल पाचोळे, डॉ. अविनाश पाचोळे आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.