कर्जबाजारी झाला पण पठ्ठ्याने फुकटातच कांदा वाटला ; ग्राहकांचीही झुंबड
शेगाव : कांद्याचे भाव वाढताच नाक मुरडणाऱ्या ग्राहकांसाठी असा अवलिया समोर आला त्याचे कृत्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या कांद्याला 2 ते 3 रुपये किलो असा दर आहे. व्यापारी ठोकमध्ये याच किंमतीत कांदा घेतात. एवढ्या कमी किंमतीमध्ये कांदा विकण्यापेक्षा तो फुकटात वाटला तर नागरिक नाव तरी घेतील या भावनेतून शेगावच्या गणेश पिंपळे यांनी कांदा फुकटात वाटला आहे.
एरवी भावात कमी-जास्त करणारे ग्राहक मात्र कांद्याच्या ढिगाऱ्यावर तुटून पडल्याचे चित्र खामगाव आणि शेगावात पाहवयास मिळाले. कवडीमोल दराने त्रस्त झालेल्या गणेशराव यांनी जेव्हा कांदे फुकटात ही घोषणा करताच अवघ्या काही मिनिटांमध्ये कांद्याचे ढिगारे गायब झाले. ग्राहकांनी गणेशराव यांच्या भावनेचा विचार केला नाही पण कांदा दराचा वांदा झाल्याने गणेशराव आता कर्जबाजारी झाले आहेत. हे दातृत्व एक शेतकरीच दाखवू शकतो हे ही तेवढेच खरे आहे.
जिल्ह्यातील शेगाव येथे गणेश पिंपळे यांनी 2 एकरामध्ये कांदा लागवड केली होती. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढवण्याचा त्यांचा मानस होता. सर्वकाही सुरळीत असताना ऐन विक्रीच्या दरम्यान कांद्याचे असे काय दर घसरले की, बाजारपेठेपर्यंतची वाहतूकीचा खर्च निघत नव्हता. बाजारपेठेत कांद्याला भाव नाही आणि घरात, शेतामध्ये तर कांदा हा सडूनच जाणार म्हणून गोर-गरिबांना तरी कांदा फुकटात मिळेल या उद्देशाने त्यांनी शेगाव शहरातील माळीपुरा परिसरात मोफत कांदा वाटप करून एक प्रकारे आंदोलनच केले. पण त्याचा विचार न करता अनेकांनी कांदा फुकटान घेऊन जाणेच पसंत केले. अवघ्या काही मिनिटांमध्ये ढिगारे गायब बाजारपेठेत मागणी नाही आणि घरात साठवणूकीची व्यवस्था नाही. यामुळे गणेश पिंपळे यांनी कांदा फुकटात वाटू पण घरी घेऊन जायचा नाही असे ठरविले.
भाव तर सोडाच सदर कांदा कुणी घ्यायलाही तयार नसल्याने शेतकऱ्याने हतबल होऊन हा कांदा घरी परत आणला.. तर कांदा पडून- पडून खराब होईल म्हणून शेतकरी पिंपळे यांनी कांदा घेऊन जाण्यासाठी नागरिकांना आवाहन केले असता मोफत कांदे देत असल्याचे कळताच अवघ्या काही मिनिटांत कांदे घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. जागोजागी रचलेले कांद्याचे ढिगारे अवघ्या काही वेळात रिकामे झाले.