संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर नवीन खळबळजनक आरोप
मुंबई (प्रतिनिधी) शिवसेना खासदार संजय राऊत विरूद्ध भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबताना दिसत नाहीत. आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर नवीन खळबळजनक आरोप केला आहे. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली याच्यावर हे लोक काही बोलत नाहीत. त्यावर भाजपच्या लोकांनी बोललं पाहिजे. भाजपच्या दबावामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. या किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना दोन वेळा धमकी दिली, असा नवा गंभीर आरोप करून राऊत यांनी खळबळ उडवून दिली.
सोमय्या पिता-पुत्र दोघेही लवकरच जेलमध्ये जाणार असा दावा पुन्हा राऊत यांनी केल .शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज, शुक्रवारी पुन्हा किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला. किरीट सोमय्या कोण आहे? इथे-तिथे फिरून बंगले शोधत आहेत. तुरुंगात जाण्याचा मार्ग ते शोधत आहेत, असं राऊत म्हणाले. ठाकरे कुटुंबीयांच्या १९ बंगल्याबाबत विचारलं असता, यावर वारंवार स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या जमिनीवर एकही बंगला नाही. अदृश्य झालेले आहेत. हा भुताटकीचा प्रकार वाटतो. भाजपच्या नेत्यांना भुताटकी झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या बेनामी मालमत्ता आहेत, म्हणून ते बोंबलत सुटले आहेत, असा टोला राऊत यांनी यावेळी लगावला..



