रेती वाहतूक करणार्या ट्रकने मोटारसायक लस्वारास चिरडले ; एक ठार, एक गंभीर
सुंडगी फाट्यावरील घटना : होळी दिवशी घडलेल्या घटनेने सांगवीउमर गावावर शोककळा
देगलूर (प्रतिनिधी) सगरोळी रेती घाटावरून रेती वाहून नेणाऱ्या मालट्रक ने सांगवी उमरहुन देगलूर कडे जाणाऱ्या मोटरसायकल स्वारास समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सुंडगी फाट्यावर होळीच्या दिवशी दुपारी घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या प्रकरणातील ट्रक चालक अपघात स्थळावरून ट्रक चालू स्थितीत ठेवूनच पळून गेल्याने या मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत ठप्प होती, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन वाहतूक सुरळीत केली. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. याबाबतीत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सांगवी उमर येथील तरुण जेजेराव दिनेश लोहबंदे (वय १७) व दत्ता झरीमन लोहबंदे (वय २४) होळी सणाच्या खरेदीसाठी सांगवी (उमर) वरून मोटरसायकल क्रमांक एम एच २६ ए. डब्ल्यू. ७०० वरून जात होते, त्याच वेळी सगरोळी रेती घाटावरून शहापूर मार्गे रेती घेऊन हनुमान हिपरगा कडे जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकल १५ मीटर पर्यंत फरफटत गेली यात जेजेराव लोहबंदे हा युवका च्या देहाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते . तर दत्ता लोहबंदे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी देगलूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नागरिक जमल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती . पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.




