‘या’ देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता क्वारंटाईन, आरटीपीसीआरची गरज नाही !
मुंबई (वृत्तसंस्था) आता संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि दुबईवरुन महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सात दिवसीय होम क्वारंटाईन आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. मुंबई महानगरपालिकेने नव्या ट्रॅव्हल गाइडलाइंस 17 जानेवारी म्हणजेच आजपासून लागू केल्या आहेत. याबाबतची माहिती काल महानगरपालिकेने ट्विट करुन दिली आहे.
बीएमसीनं म्हटलं आहे की, मुंबईमध्ये संयुक्त अरब अमिरातसह दुबईहून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता सक्तीनं ७ दिवस होम क्वारंटाइन आणि आल्यानंतर RTPCR चाचणीत सूट देण्यात आली आहे. २९ डिसेंबर रोजी दुबईसह यूएईमधून आलेल्या प्रवाशांना मुंबईत आल्यानंतर ७ दिवस होम क्वारंटाइन आणि आल्यानंतर RTPCR चाचणी अनिवार्य करण्यात आली होती.
मुंबईमध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत असल्याचे चित्र
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातही दररोज ४० हजारांच्या पुढे रुग्णसंख्येची नोंद होत आहे. अशातच मुंबईमध्ये मात्र, रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. बुधुवारी मुंबईत १६ हजार ४२०, गुरुवारी १३ हजार ७०२, शुक्रवारी ११ हजार ३१७, शनिवारी १०,६६१ तर रविवारी मुंबईत ७ हजार ८९५ नवे कोरोना बाधित आढळले होते. त्यामुळे त्यात सातत्याने घट दिसून आली. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला असल्याचे मत राज्य सरकारच्या कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं आहे.