शिंदखेडा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम संपन्न
ग्राहकांनी फसवणुकी पासून सावधान राहावे - नायब तहसीलदार वाडीले यांचे प्रतिपादन
शिंदखेडा (प्रतिनिधी) राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्ताने आज रोजी तहसील कार्यालय शिंदखेडा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिंदखेडा व तहसील कार्यालय शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले यांनी, संस्थापक स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या कार्याचा गौरव करीत ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ग्राहकांच्या हक्कांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांनी ग्राहक आणि शेतकरी तसेच उत्पन्न वाढीसाठी शेतीत करावयाचे विविध प्रयोग आणि रयत बाजार संकल्पना विषयक अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. अतिथी दिपक माळी मुख्याध्यापक यांनी ग्राहक म्हणून सामान्य माणूस दैनंदिन जीवनात किती सहज नाडला जातो, आणि यातून कसा बचाव करता येऊ शकतो. हे अनेक उदाहरणांनी पटवून दिले. तर शिंदखेडा ग्राहक पंचायत संघटक योगेंद्र सनेर यांनी आपल्या प्रास्ताविकातून ग्राहक संरक्षण कायदा आणि सामान्य माणूस आणि ग्राहक पंचायत यातील दुवा साधण्याचा उत्तम प्रयत्न केला.
याप्रसंगी अतिथी तालुका कृषी पर्यवेक्षक गणेश महाले, व्यापारी प्रतिनिधी चंद्रकांत गोधवानी, संजय पारख, कार्यक्रमाचे आयोजक तालुका पुरवठा अधिकारी हर्षा दुधे, पुरवठा अव्वल कारकून गोलप, ग्राहक पंचायत शिंदखेडा व रेशन धारक तालुका अध्यक्ष आर. आर.पाटील, सचिव सुरेश कुंभार, सदस्य अशोक राखेचा यासह पत्रकार भिका पाटील, पत्रकार व ग्राहक पंचायत सदस्य जितेंद्र मेखे, परेश शहा, यादवराव सावंत आदी मान्यवर व मोठ्या संख्येने व्यापारी व ग्राहक बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राहक पंचायत सदस्य रवींद्र ठाकूर यांनी केले. यशस्वीतेसाठी ग्राहक पंचायत शिंदखेडा व तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी पदाधिकारी बंधू भगिनींचे मोलाचे योगदान लाभले.




