ग्राहकांना योग्य तो न्याय देण्याचे कार्य भविष्यात सुरूच राहावे : मंजुळा गावित
नंदुरबार : ग्राहकांना योग्य तो न्याय देण्याचे कार्य ग्राहक पंचायत महाराष्ट्रातर्फे करण्यात येत आहे. ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी लावलेले रोपट्याचे वटवृक्ष आज संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे. मनुष्य कितीही मोठ्या पदावर असला तरी तो ग्राहकच असतो. किरकोळ फसवणुकीकडे दुर्लक्ष करु नये. ग्राहकांना योग्य तो न्याय देण्याचे कार्य भविष्यात सुरूच राहावे आणि या संघटनेचे कार्य मजबूत भक्कम व्हावे. यासाठी कार्य करणाऱ्या साधकाच्या तळमळीला साथ देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे भावपूर्ण उद्गार साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळाताई गावित यांनी व्यक्त केले.
नवापूर येथील सुरूपसिंग हिऱ्या नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक विभागीय एकदिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन दीपप्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद, स्व. बिंदुमाधव जोशी, स्व. मार्तंडराव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नवापूरच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी देखील ग्राहक चळवळीबद्दल समाधान व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रात ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी कार्यकर्ता कसा असावा याच्यावर प्रबोधन केले. तर राज्य संघटक सर्जेराव जाधव यांनी शेतकरी ग्राहक प्रबोधन याच्यावर मार्गदर्शन केले. नाशिक विभागीय अध्यक्ष डाॅ अजय सोनवणे यांनी सायबर गुन्हे याच्यावर सखोल मार्गदर्शन केले. संजय शुक्ला यांनी नवीन सुधारित ग्राहक संरक्षण कायदा तर चंद्रशेखर देशमुख यांनी बँकिंग विमासेवा यावर मार्गदर्शन केले. प्राचार्य बी. एम. भामरे यांनी ग्राहक चळवळ इतिहास व कार्यशैली याच्यावर मार्गदर्शन केले तर विलास देशमुख यांनी सामाजिक समस्या निर्मितीसाठी आवश्यक तंत्र कौशल्य यावर प्रबोधन केले.
याशिवाय नंदुरबार येथील अॅड निता देसाई यांनी ग्राहक आयोग कामकाज यासंदर्भात मार्गदर्शन केले. ग्राहक पंचायतचे राज्याध्यक्ष विजय लाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्राहकांचे संघटन करणारी एकमेव संघटना असून भारतीय नीती आयोगाशी निगडित ग्राहकांचे काम करणारी अत्यंत प्रभावशाली संस्था राज्यात सुरू आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीस जिल्हा संघटक आर. ओ. मगरे यांनी ग्राहक गीत सादर केले. ग्राहक पंचायत जिल्हा संघटक डॉ. ए. बी. महाजन यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अशोक सूर्यवंशी यांनी केले. आभार ज़िलहा सचिव श्रीकांत पाठक यानी मानले. एकदिवसीय अभ्यासवर्गात नाशिक सहसंघटक सुरेन्द्र सोनवणे, नंदुरबार ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष अबोली चंद्रात्रे, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे, योगेश्वर जळगावकर’, बी. डी. गोसावी, पूनम भावसार, गोरखनाथ बावा, डॉ गणेश ढोले, अॅड नीलेश देसाई, तळोदा येथील राजेश चौधरी ,रमेशकुमार भाट,अलपेश जैन, चन्द्रकांत डागा यांच्यासह नाशिक विभागातील नंदुरबार, तळोदा, शहादा, नाशिक, नगर, धुळे, शिंदखेडा येथील साधक उपस्थित होते.