मराठी भाषेला योग्य उंचीवर न्या : पत्रकार विजय भोसले
साक्री (प्रतिनिधी) कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेचा अभिमान बाळगत मराठी भाषेला योग्य उंचीवर न्या. असे आवाहन अंनिस चे जिल्हा उपाध्यक्ष व पत्रकार विजय भोसले यांनी केले.
परिवहन महामंडळाच्या साक्री आगारात मराठी भाषा गौरव दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी साक्री आगार प्रमुख किशोर महाजन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले, ग्राहक पंचायत चे जिल्हा सहसंघटक पी.झेड.कुवर, प्रशिक्षणार्थी आगार प्रमुख इम्रान पठाण उपस्थित होते.
मराठी भाषेचा अभिमान बाळगत पुढे म्हणाले की, २७ फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी भाषेतील थोर साहित्यिक कवी कुसुमाग्रज उर्फ वि . वा . शिरवाडकर यांचा जन्मदिन आहे. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी राजभाषेने कोणत्याही इतर भाषांचा अनादर न करता, त्या त्या भाषेतील अनेक शब्द स्वीकारले आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाने इतर भाषिकांना महाराष्ट्रात स्वीकारले म्हणून तर आपण सर्व गुण्यागोविंदाने एकत्र रहात आहोत. ही सौजन्यशील वृत्ती मराठी भाषेने आपल्यात रुजवली आहे. यावेळी पी.झेड.कुवर यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात महाजन यांनी एस.टी. महामंडळ च्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचा कायमस्वरुपी वापर करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ लिपिक टी.के.पठाण यांनी केले. यावेळी साक्री आगाराचे स्थानक प्रमुख कैलास शिंदे, कार्यशाळा अधिक्षक प्रकाश शिगांणे, वाहतुक नियंत्रक अकुंश जिरे, वरिष्ठ लिपिक पराग वंजारी, असलम पठाण, निंबा मोरे, हिम्मत सोनवणे, देवरे, बागुल, सुभाष लाडे, रंजना जाधव, अंजली कुंभार्डे, शहनाज शेख, गंगा चौरे, मनिषा पाटील आदी उपस्थित होते.