गोंदेगाव येथे माजी विद्यार्थ्यांची स्नेहभेट कार्यक्रम संपन्न
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन तालुका विशेष प्रतिनिधी
सोयगाव : श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोंदेगाव येथे भाऊबीजेच्या दुसऱ्या 1999 या वर्षी दहावी आणि 2001 या वर्षी बारावी शिकलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहभेट कार्यक्रम आयोजित केलेला होता.
सदर कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी त्यांना अध्यापन केलेल्या शिक्षकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांचे पुनश्च बहुमोल मार्गदर्शन मिळावे म्हणून सर्व शिक्षकांनाही आमंत्रित केलेले होते.
कार्यक्रमास ज्या अध्यापकांनी शिकवले, संस्कार केलेत, मूल्यांची रुजवणूक केली अशा आदरणीय गुरुजनांना आमंत्रित करायचे असे सर्व मित्रांनी ठरवले. याच शाळेत कार्यक्रम साजरा करता यावा यासाठी शाळेतील सध्या कार्यरत असलेले प्राचार्य चितोडकर सर, प्राध्यापक वर्ग आणि संस्थेचे अध्यक्ष यांनी शाळेचा विकास सभागृहात जागा उपलब्ध करून दिली.
कार्यक्रमाची डिजिटल पत्रिका बनवणे, बॅनर बनवणे यासाठी वर्गमित्र अमोल चिकटे यांची मदत मिळाली.
तसेच वर्गमित्रांची यादी मिळावी म्हणून सरांनी स्वतः लक्षपूर्वक तब्बल 20 वर्षांपूर्वीच्या शाळेतील जुन्या हजेऱ्या रमेश महालपुरे आणि त्यांच्या मित्रपरिवारास उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार सर्व मित्रांना मोबाईल व्हाट्सअप्प फेसबुक च्या माध्यमातून संपर्क साधण्यात आलेत.
कार्यक्रमास प्रा व्ही जे चौधरी सर, गायकवाड सर, इंदुरकर सर शाळेचे प्राचार्य चितोडकर सर, दाभाडे सर महाजन सर. प्रा भागवत महालपुरे सर, प्रा सिनकर सर, कोठावदे सर, मोकाशी सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य चितोडकर सर यांनी स्विकारले.
कार्यक्रमास आलेल्या सर्व गुरुवर्यांचे मित्रपरिवाराने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार केला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले प्राध्यापक गायकवाड सरांनी त्यांच्या भाषणातून माजी विद्यार्थ्यांची प्रगती बघून कौतुक व्यक्त केले. आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी आणि सर्वोच्च शिखर गाठावे याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी इतक्या वर्षानंतर प्राध्यापकांना आमंत्रित करून त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला या शाळेतील माजी विद्यार्थ्यांची नम्रता आणि गुरुजांनाविषयी आदरपूर्वक भाव बघून प्राध्यापक गायकवाड यांना गहिवरुन आले. अत्यंत भावनिक वातावरण झाल्याने सरांनी आपले मनोगत आटोपते घेतले.
प्राध्यापक भागवत महालपुरे सरांनी स्वतःला स्वतःच्या परिक्षणातून ओळखा त्याशिवाय आपण जग ओळखूच शकणार नाहीत. असा बहुमोल संदेश दिला. स्वतःतील शक्ती ओळखून तिचा इतरांसाठी वापर करावा असेही आवर्जून सांगितले. तसेच वर्गमित्रांचा एकोपा बघून सरांना देखील आत्यंतिक गहिवरून आले.
प्रा. व्ही जे चौधरी सरांनी यशाची शिखरे कितीही गाठली तरी शेवटी जमिनीवर पाय असायला हवेत असा अनमोल संदेश देऊन मार्गदर्शन केले.
प्रा. इंदूरकर सर यांनी फक्त स्वप्न बघू नका तर आपण ज्या क्षेत्रात काम करीत आहात त्या क्षेत्रात आपल्या कामाचा उत्कृष्ट ठसा उमटवा आणि त्यासाठी आत्यंतिक मेहनत करा असा अनमोल संदेश दिला.
तब्बल वीस वर्षांनंतर एवढा मित्रपरिवार एकत्र येऊन स्नेहभेट कार्यक्रम साजरा केल्याबद्दल दाभाडे सरांनी सर्व वर्गमित्रांचे अभिनंदन केले आणि यापुढील काळात सुखदुःखात एकत्र राहा असा अनमोल सल्ला दिला.
सुंदर आणि नियोजनबद्ध कार्यक्रमाबद्दल प्रा.सिनकर सरांनी आत्यंतिक समाधान व्यक्त केले व सर्वांचे अभिनंदन केले.
मित्रपरिवारांपैकी सचिन भामरे, संकेत पवार, विलास औटे, विजय परदेशी, राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर संसारे, शुभांगी महालपुरे, दुर्गा राठोड या सर्वांनी शाळेने दिलेले संस्कार आणि शिकवण जीवनात किती मोलाचे ठरलेत याबद्दल त्यांच्या भाषणातून मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर वर्गातील भगिनींसोबत आलेले त्यांचे पती कापडे सर, आणि अभय जैन यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची आठवण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेटवस्तू रूपाने सर्व वर्गमित्रांना आदरणीय गुरुजनांच्या हस्ते देण्यात आली.
तसेच कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच भाऊबीज सण होता त्यानिमित्ताने वर्गातील भगिनींना वर्गमित्रांकडून साडी भेट देण्यात आली.
त्यांनंतर सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.
इयत्ता अकरावीच्या वर्गात शिक्षकांनी पुन्हा एकवेळ त्यांच्या विषयातील घटक थोडक्यात शिकवले आणि तब्बल वीस ते बावीस वर्षांपूर्वीची अनुभूती दिली त्याबद्दल सर्व अध्यापक वर्गाचे माजी विद्यार्थ्यांनी खुप खुप आभार मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य चितोडकर सरांनी या एकजुटीबद्दल आणि साजरा केलेल्या कार्यक्रमाबद्दल बोलताना सांगितले की, “श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत हा आगळावेगळा यशस्वी आणि संस्कारांची उत्तम रुजवणूक दिसून येत असलेला हा माजी विद्यार्थ्यांचा पहिला यशस्वी कार्यक्रम आहे.” त्याबद्दल सरांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे खुप खुप अभिनंदन आणि कौतुक केले. रमेश महालपुरे यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले.
सर्वांत शेवटी रमेश महालपुरे यांनी यापुढील काळातही आम्ही वर्गमित्र असेच एकजूट राहू शाळेच्या प्रगतीसाठी नक्कीच प्रयत्नशील राहू असे आश्वासन देऊन आभार व्यक्त केले
कार्यक्रमासाठी रामेश्वर सावळे आणि संदिप महालपुरे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमासाठी रमेश महालपुरे यांच्या मित्रांपैकी अमोल चिकटे, शाम देवरे, दीपक खोडके, अजबराव पाटील, शिवाजी पाटील, संकेत पवार, विनोद बिंदवाल, रामेश्वर सावळे, शाम निकम, विजय परदेशी या सर्व मित्रांनी मोलाचे परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वीरीत्या साजरा केला.