पाकव्याप्त काश्मीरबाबत खासदार कपिल पाटील यांचं मोठं विधान ; म्हणाले..
कल्याण (प्रतिनिधी) केंद्रीय राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरबाबत मोठं विधान केलं आहे. पाकव्याप्त असलेला काश्मीरचा भाग हा २०२४ पर्यंत भारतात येईल, कारण या गोष्टी पंतप्रधान मोदीच करु शकतात, असा आशावाद खासदार पाटील यांनी व्यक्त केला. ते कल्याणमध्ये बोलत होते.
काश्मिरमधील कलम ३७० हा विशेष राज्याचा दर्ज्याचा कलम आणि ३५ ए हे कलम हटवण्यात आले. यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. विरोधकांच्या या टीकेला प्रत्त्युतर म्हणून पंतप्रधान मोदींनी पी व्ही नरसिंह राव यांचां संदर्भ दिला होता. या घटनेची खासदार पाटील यांनी आठवण करुन दिली.
“मला आठवंत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचा उल्लेख केला. तेव्हा नरसिंहराव यांनी पार्लामेंटचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. या अधिवेशनात नरसिंहरावांनी कायदा मंजूर करुन घेतला. त्यामध्ये काश्मिर ही मोठी समस्या आहे. पाकिस्तामध्ये असलेला काश्मिरचा भाग हा आपल्या ताब्यात घ्यायला हवां, त्यानंतर हा प्रश्न निकाली निघेल. यावर मोदी तेव्हा म्हणाले होते की हे काम तुमचंच आहे. तुमच्याकडून झालं नाही म्हणून आम्ही करतोय”, असं खासदार पाटील यांनी स्पष्ट केलं. कल्याणमध्ये एका व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत खासदार पाटील यांनी हे विधान केलं.