‘जास्त वेळ मास्क लावू नका, तो आरोग्यासाठी त्रासदायक कारण…’ ; काँग्रेस आमदाराचा अजब दावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या संकटात मास्क लावण्याचं आवाहन केलं जात असताना काँग्रेस आमदाराने अजब दावा केला आहे. मास्क वापरणं हे आरोग्यासाठी त्रासदायक असून मास्कचा जास्त वापर करू नये असं काँग्रेस आमदाराने म्हटलं आहे. तसेच कोरोना चाचणीचाही काही उपयोग नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या या विधानावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
झारखंडचे काँग्रेस आमदार इरफान अन्सारी यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना मास्क, करोना चाचणी आणि तिसऱ्या लाटेविषयी अजब तर्कट मांडलं. “माझ्याकडे मास्क आहे. पण आपण जास्त वेळ मास्क घालता कामा नये. मी एक आमदार म्हणून नाही, तर एमबीबीएस डॉक्टर म्हणून सांगतोय. जास्त वेळ मास्क नका लावू. गर्दीच्या ठिकाणी फक्त मास्क घाला. तुम्ही श्वास घेत आहात, कार्बन डाय ऑक्साईड सोडताय, पुन्हा तोच नाकावाटे आत घेताय.. काय चाललंय हे?”, असा प्रश्नच आमदार महोदयांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, करोनाच्या तिसऱ्या लाटेचंही फार टेन्शन न घेण्याचा सल्ला आमदार इरफान अन्सारी यांनी दिला आहे. “करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे फार घाबरून जायचं कारण नाही. मी वारंवार सांगतो आहे. आम्ही देखील बघतोय. आमचे कुटुंबीय देखील आजारी होते. आज तुम्ही चाचणी करा, पॉझिटिव्ह येईल. परत करा, निगेटिव्ह येईल. त्याची काय किंमत आहे?” असाही सवाल अन्सारी यांनी केला आहे.
“जर तुम्ही आरटीपीसीआर करताय, त्याचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला, तर ते इन्फेक्शन दोन-तीन दिवसांत संपून जाईल. पॅरासिटॅमॉल खा, अँटिबायोटिक खा”, असा अजब सल्ला अन्सारी यांनी दिला आहे. एकीकडे फक्त भारतच नसून जगभरातले तज्ज्ञ करोनाविषयी सतर्क करत असताना, मास्क-चाचण्यांविषयी आग्रह धरत असताना आणि आजपर्यंत लाखो लोकांचे करोनामुळे मृत्यू झालेले असताना दुसरीकडे इरफान अन्सारी मात्र मास्क, करोना चाचणी आणि तिसऱ्या लाटेविषयी अजब दावा करत आहेत.